नवी दिल्ली - उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत सत्ता हाती घेताच चर्चेत आलेत. महिलांनी फाटक्या जीन्स घालण्यावरून केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावरून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. रावत यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर राजकीय नेते, सेलिब्रिटी यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा त्यांनी जावई शोध लावलाय. एका कार्यक्रमाला संबोधित करताना अमेरिकेने भारतावर 200 वर्ष राज्य केल्याचे ते म्हणाले. इतर देशांच्या तुलनेत भारत कोरोना संकटाला तोंड देण्याचे चांगले काम करीत आहे. आपल्याला 200 वर्षे गुलाम ठेवून, जगावर राज्य करणारी अमेरिका सध्याच्या काळात संघर्ष करीत आहे, असे त्यांनी म्हटलं.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी रविवारी जागतिक वनीकरण दिनानिमित्त नैनीताल जिल्ह्यातील रामनगर येथे आयोजित कार्यक्रमात भाग घेतला. या वेळी त्यांनी लोकांना उद्देशून वादग्रस्त विधान केले.
कोरोना काळात सरकारला प्रत्येक घरात प्रति युनिट 5 किलो रेशन दिले. कोरोना काळात दोन मुले होती, त्यांना 10 किलो आणि ज्यांना 20 होती, त्यांना एक क्विंटल रेशन देण्यात आले. यावेळी दोन अपत्ये असलेल्यांच्या मनात ईर्ष्या निर्माण झाली. यात दोष कुणाचा नाही. जेव्हा वेळ होता, तेव्हा तुम्ही 20 ची निर्मिती केली नाही, असेही विधान त्यांनी केले.
मोदींची देवांशी तुलना -
उत्तराखंडचे सीएम तीरथसिंह रावत आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. यापूर्वी हरिद्वार येथे एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना भगवान कृष्ण आणि राम यांच्याशी केली. एक दिवस लोक पंतप्रधान मोदींची पूजा करतील, असेही तीरथसिंग रावत म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर कडक टीका झाली होती.
फाटक्या जीन्सवरून विधान -
तीरथ सिंह रावत यांनी महिलांनी जीन्स घालण्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. आजकाल महिला फाटलेली जीन्स घालतात, हे कसले संस्कार आहेत? या महिला आपल्या मुलांना काय संस्कार देतील, हे विधान त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. चौफेर टीका झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली होती.
हेही वाचा - रिप्ड जीन्स विधानावर महिला नेत्यांचा तीरथसिंह रावत यांच्यावर हल्लाबोल