नवी दिल्ली - नोबेल शांती पुरस्कार विजेते तिबेट धर्मगुरु दलाई लामा यांना कोरोना लस टोचवण्यात आली आहे. धर्मशालामधील जोनल रुग्णालयात त्यांना कोरोना लस देण्यात आली. दलाई लामा पूर्ण प्रोटोकॉलचे पालन करत रुग्णालयात आले होते.
दलाई लामा यांना लस कधी टोचवण्यात येणार, यासंदर्भात जिल्हा प्रशासनानेही माध्यमांना गोंधळात ठेवले होते. त्यांच्या लसीबाबत वेगवेगळ्या तारखांविषयीही माध्यमांना माहिती देण्यात आली होती. तत्पूर्वी, 5 मार्च रोजी त्यांच्या निवासस्थानी दलाई लामा यांना लस टोचवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. शनिवारी दलाई लामा धर्मशाळा रुग्णालयात पोहोचले आणि कडेकोट सुरक्षेत त्यांनी लस टोचवून घेतली. सीएमओ डॉ. गुरदर्शन गुप्ता यांनी लसीकरणाला दुजोरा दिला आहे.
केंद्र शासनाच्या आदेशानुसार 'कोविड-१९' लसीकरण 1 मार्चपासून सुरू होत आहे. या टप्प्यात वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच, वयाची 45 वर्षे पूर्ण ते 60 वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण केले जाणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आदिंसह देशभरातील अनेक दिग्गज नेत्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली आहे.
कोरोना महामारीच प्रसार झाल्यानंतर दलाई लामा यांनी जबाबदारीचे पालन करणेही गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले होते. कोरोनासारखी महामारी आपणास शिकवण देत आहे, की आपण वेगवेगळे राहिलो तरी आपण विभक्त नाही. त्यामुळे आपण सर्वांची मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. मी माझ्या आयुष्यात अनेक युद्धे आणि भयानक संकटांना नष्ट होताना पाहिले आहे, त्याचप्रमाणे कोरोनाचेही हे संकट देखील लवकरच नष्ट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.
दलाई लामा यांच्याविषयी -
दलाई लामा हे तिबेटी परंपरेतील सर्वोच्च गुरू मानले जातात. तिबेटमध्ये चीन सरकारने सुरू केलेल्या अनन्वित अत्याचारांनंतर विद्यमान 14 वे दलाई लामा यांनी 1959 साली भारतात आश्रय घेतला. भारताने सध्या जवळपास एक लाख तिबेटी नागरिकांना आश्रय दिला असून, तिबेटचे सरकारही भारतातूनच कार्यरत आहे. दलाई लामांनी तिबेटी लोकांच्या हितरक्षणासाठी हयातभर कार्य केले असून इ.स. 1989 साली त्यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.