श्रीनगर : जम्मू-काश्मीरची उन्हाळी राजधानी श्रीनगरमध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात तीन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींवर नजिकच्या रुग्णालयात उपचार केले जात असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे.
सुरक्षा दलावर फेकला ग्रेनेड
श्रीनगरमधील वर्दळीच्या अमिरा कदाल भागात मंगळवारी दुपारच्या सुमारास दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. अमिरा कदा पुलावरून जाणाऱ्या सुरक्षा दलाच्या दिशेने दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला. हा ग्रेनेड रोडच्या बाजूला जाऊन त्याचा स्फोट झाला. या हल्ल्यात तारीक अहमद यांच्यासह तिघे जण जखमी झाले आहेत. दरम्यान, हल्ल्यानंतर परिसरात दहशतवाद्याला शोधण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या चार दिवस आधी हल्ला
भारतीय स्वातंत्र्य दिनाला अवघ्या चार दिवसांवर आलेला असतानाच हा हल्ला झाल्याने सुरक्षेची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर श्रीनगरसह संवेदनशील ठिकाणांवरील सुरक्षा वाढविली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - जम्मू आणि काश्मीरला पूर्ववत राज्याचा दर्जा बहाल करा, राहुल गांधींची मागणी