नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र असले तरी तिसऱ्या लाटेचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. येत्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस देशात कोरोनाची तिसरी लाट धडकेल, अशी चेतावणी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चमधील (ICMR) महामारी विज्ञान आणि संक्रमन रोगांचे प्रमुख डॉ. समीरण पांडा यांनी दिली. तसेच पहिल्या दोन लाटेचा प्रभाव न झालेल्या राज्यांनाही त्यांनी सतर्क राहण्यास सांगितले.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जर निर्बंध लादले नाहीत. तर तीव्र तिसर्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे. प्रत्येक राज्यांनी रुग्णांची तपासणी करणे आणि तेथील कोरोना परिस्थितीचे परीक्षण करणे महत्वाचे असल्याचे डॉ पांडा म्हणाले.
काही राज्यात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेचा कमी परिणाम झाला होता. त्यांनाही यावेळेस सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. निर्बंधांची अंमलबजावणी झाली नाही. तर राज्यांवर तिसर्या लाटेचा वाईट परिणाम होऊ शकतो, असे डॉ पांडा म्हणाले. कोरोना विषाणूची तिसरी लाट ऑगस्ट महिन्यात येऊ शकते. तिसरी लाट किती धोकादायक असेल, हे आताच सांगितले जावू शकत नाही.
कोरोना महामारीत तिसरी, चौथी, पाचवी म्हणजे कितीही लाटा येऊ शकतात. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण लाटेचा सामना करण्यास किती तयार आहोत? लसीकरणाचा वेग वाढविला गेला आहे. जेणेकरून तिसरी लाट येण्यापूर्वी अधिकाधिक लोकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सर्व तयारी करण्यात येत आहे. केंद्राने लसीकरणावर भर दिला असून नियम, निर्बंध पाळण्याच्या सूचना राज्य सरकारांना दिल्या आहेत. केंद्र सरकारने राज्यांना सतर्क राहण्याचे सांगितले आहे.
गांभीर्य ओळखा, सावध व्हा -
निती आयोगाचे सदस्य डॉ. व्हि के पॉल यांनी देशातील कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांसंदर्भात शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनीही तिसऱ्या लाटेसंदर्भात गंभीर इशारा दिला. जगातील अनेक ठिकाणी कोरोनाची परिस्थिती वाईटातून अत्यंत वाईटाकडे गेल्याचे बघायला मिळाले आहे. संपूर्ण जगच तिसऱ्या लाटेच्या दिशेने जात आहे. डब्ल्युएचओने याचा इशारा दिला असून सर्वांनीच गांभीर्य ओळखले पाहिजे. हा धोक्याचा रेड अलर्ट आहे, असे पॉल म्हणाले. या पत्रकार परिषदेत सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने पॉल यांनी दिलेला इशारा महत्वाचा असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे? जाणून घ्या तज्ञांचे मत
हेही वाचा - Coronavirus : संपूर्ण जगच तिसऱ्या लाटेच्या दिशेने जात आहे; ऐका, काय म्हणाले निती आयोगाचे सदस्य?