अलवर (राजस्थान) : येथे रात्री उशिरा मोठी दुर्घटना टळली. गीतानंद शिशु रुग्णालयामागील एफबीएनसी वॉर्डची ऑक्सिजन पाइपलाइन चोरट्यांनी कापली. त्यावेळी एफबीएनसी वॉर्डमध्ये सुमारे 20 नवजात बालके ऑक्सिजनच्या आधारावर होती. ऑक्सिजन पुरवठा बंद होताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. त्यानंतर घाईघाईत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सिलेंडरमधून मुलांना ऑक्सिजन दिला. दिलासादायक म्हणजे या दरम्यान एकाही नवजात बालकाला कोणतीही अडचण आली नाही.
पाइपलाइन कापली : चोरट्यांनी रात्री उशिरा रुग्णालयाच्या आवारातील ऑक्सिजन पुरवठा करणारी पाइपलाइन चोरण्याचा प्रयत्न केला. अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी ही पाइपलाइन कापली. त्यावेळी रुग्णालयातील एफबीएनसी वॉर्डमध्ये दाखल असलेली वीस मुले ऑक्सिजन सपोर्टवर होती. अचानक ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने या मुलांना त्रास होऊ लागला. कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या आवारात ठेवलेले 10 ऑक्सिजन सिलिंडर एफबीएनसी वॉर्डात नेले आणि तेथे नवजात बालकांना ऑक्सिजन दिला.
दोन चोरटे पकडले : यावेळी रुग्णालयात नैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने अलार्म वाजवल्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या मागील बाजूने पळत जाणाऱ्या दोन चोरट्यांना पकडले आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणाची माहिती तातडीने रुग्णालय प्रशासनाला देण्यात आली. अधिकाऱ्यांनी अभियंत्यांना घटनास्थळी बोलावून रात्रीच पाइपलाइनची दुरुस्ती करून घेतली. त्यानंतर आयसीयूमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत झाला. रुग्णालय प्रशासन या प्रकरणाचा तपास करत आहे.
यापूर्वीही घडल्या अशाच चोऱ्या : यापूर्वीही रुग्णालयात अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. चोरटे खुलेआम विद्युत तारा, पाइपलाइन, मोटार आदी वस्तूंची चोरी करतात, असे रुग्णालयातील रक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र पोलिस याकडे लक्ष देत नसून अजूनही चोरट्यांवर कारवाई झाली नाही आहे. गीतानंद शिशु रुग्णालयातील आयसीयुमध्ये मुलांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ मुलांना ऑक्सिजन मिळाला नसता तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. लोकांनी घटनास्थळावरून दोन चोरट्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलीस या दोन्ही चोरट्यांची कसून चौकशी करत आहेत. तेथे उपस्थित लोकांनी चोरट्यांना मारहाण केली, मात्र पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही चोरट्यांना पकडले. त्याच्या इतर साथीदारांनाही अटक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा : Samastipur Railway Track Stolen : कधी रेल्वे इंजिन तर कधी लोखंडी पूल, आता चक्क रेल्वे रुळांचीच चोरी!