वायनाड (केरळ) - चोराला उपरती झाल्याची घटना केरळमध्ये नुकतीच चर्चेचा विषय ठरत आहे. चोरांचे मानसिक परिवर्तन होणे ही नेहमीच चर्चा करण्यासारखी गोष्ट असते. वायनाडच्या पुलपल्लीतील एका चोरट्याने एका व्यक्तीचे 700 रुपये चोरले होते. आता अनेक वर्षानंतर त्या व्यक्तीला माफीनामा लिहून त्याने 2000 रुपये परत केले आहेत. त्या व्यक्तीच्या पत्नीला माफीनामा पत्र आणि पैसे मिळाले. या पत्रात चोराने माफी मागितली आहे, तसेच क्षमा करावी अशी विनंती केली होती.
मात्र हे पत्र कुणी लिहिले आहे हे कळू शकले नाही. या पत्रात लिहिले आहे की, प्रिय मेरी, अनेक वर्षांपूर्वी मी जोसेफ यांच्याकडून 700 रुपये किमतीचे साहित्य चोरले होते. आता साहित्याची किंमत सुमारे 2,000 रुपये असेल. मी ती रक्कम या पत्रासह पाठवत आहे. कृपया हे पैसे घ्या आणि मला क्षमा करा.
पुलपल्लीजवळील पेरिक्कल्लूर येथील पट्टनीकूप येथे राहणाऱ्या मेरीला बुधवारी हे पत्र आल्यावर आश्चर्य वाटले. तिला फक्त तिच्या मुलांकडून ख्रिसमस कार्ड मिळाायचे. पोस्टाद्वारे दुसरे काहीही तिला मिळाले नाही. पत्रावर प्रेषकाचे नाव नसल्याने तिला संशय आला पण तिने ते उघडायचे ठरवले. पत्र उघडल्यावर तिला खरोखरच धक्का बसला कारण त्यात 2000 रुपये होते.
या बदललेल्या चोराला आपण माफ केल्याचे सांगू शकलो नाही याचे वाईट वाटते, असे मेरी म्हणाली. मेरीच्या पतीचा १० वर्षांपूर्वी मृत्यू झाला. चोर कोण होता हे शोधण्यासाठी तिच्याकडे आता कोणताही मार्ग नाही. इतर चोरांचेही असेच मनपरिवर्तन व्हावे असे मात्र तिला वाटते.
हेही वाचा - Couple names daughter India, स्वातंत्र्याचा अनोखा अमृत महोत्सव, मुलीचे नाव ठेवले इंडिया