नवी दिल्ली - राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी (१० जनपथ) येथे भेट घेतली. राजस्तानमध्ये निर्माण झालेल्या पक्षांतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या बैठकीनंतर सचिन पायलट म्हणाले, राजस्थानबाबत पक्ष सकारात्मक निर्णय घेईल. (Sachin Pilot Meets Sonia Gandhi) आम्ही पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी बोललो आहोत. आम्ही जे काही सांगायचे ते त्यांनी ऐकले आहे. २०२३ च्या विधानसभा निवडणुका एकत्र लढल्या पाहिजेत, अशी आपली सर्वांची इच्छा आहे. आम्हाला खात्री आहे की आम्ही पुन्हा काँग्रेसचे सरकार स्थापन करू. माझे पहिले प्राधान्य राजस्थानला आहे असही ते म्हणाले आहेत.
काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल - यावेळी पक्षाचे संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल हे सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी उपस्थित होते, असे सांगण्यात येते. अशोक गेहलोत यांच्यानंतर सचिन पायलट यांना राजस्थानचे मुख्यमंत्री बनवण्याची चर्चा होती. दुसरीकडे, काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी येत्या एक-दोन दिवसांत राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेणार आहेत.
तो निर्णय सोनिया गांधी घेतील - याआधी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. जयपूरमध्ये काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक होऊ न शकल्याने त्यांनी सोनियांची माफी मागितली. तसेच, आपण अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नसल्याचेही गेहलोत यांनी स्पष्ट केले आहे. सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर गेहलोत म्हणाले की, मुख्यमंत्रीपदी कायम राहायचे की नाही याचा निर्णय सोनिया गांधी घेतील.