वाराणसी : गंगा सतलज एक्सप्रेस ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळताच कॅंट रेल्वे स्थानकावर रविवारी सकाळी खळबळ ( Cantt railway station varanasi ) उडाली. माहिती मिळताच स्टार्टर सिग्नल ओलांडून गेलेली ट्रेन थांबवण्यात आली. तडकाफडकी पोहोचलेल्या जीआरपी टीम आणि सिगरा पोलिस स्टेशनने शोधमोहीम सुरू केली. मात्र ट्रेनमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आणि ट्रेन पुढे पाठवण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, काशी स्टेशनवरून पंजाबमधील फिरोजपूर कॅंटकडे जाणारी गंगा-सतलज एक्स्प्रेस सकाळी 6.05 वाजता कॅन्ट रेल्वे स्टेशनवरून निघाली. त्याचवेळी स्टार्टर सिग्नल ओलांडल्यानंतर लगेचच लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजरच्या वॉकी टॉकीवर ट्रेनच्या एसएलआरमध्ये बॉम्ब असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ट्रेन लगेच थांबवण्यात आली.
यानंतर एएससी, इन्स्पेक्टर आरपीएफ, जीआरपी, बीडीएस मिर्झापूर, एसआयबी वाराणसी आणि एलआययूच्या टीमने संपूर्ण वाहनाची तपासणी केली. रेल्वेत कोणताही बॉम्ब किंवा संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळून आली नाही. 8.15 पर्यंत सुमारे दोन तासांनी संयुक्त तपासणी पूर्ण झाली.