मुंबई - गानकोकिळा अशी ओळख असलेल्या व आपल्या मंत्रमुग्ध आवाजामुळे आजही संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लता मंगेशकर. भारतीय संगीत क्षेत्रातील त्यांची कारकीर्द प्रचंड मोठी आहे. (Special Stories of Lata DiDi) जाणून घेऊयात त्यांच्याविषयी काही खास गोष्टी...
लता मंगेशकर यांच्या आवाजाची भूरळ पडणार नाही, असा एकही व्यक्ती सापडणे अशक्य आहे. इतके प्रचंड यश, नावलौकीक मिळवण्यामागे मेहनत तर होतीच, पण त्याहीपेक्षा मोठा होता त्यांचा संघर्ष. लतादीदी अवघ्या १३ वर्षांच्या असताना त्यांच्यावरील पित्रुछत्र हरवले. तेव्हा संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. त्यांचे आप्त असलेले मास्टर विनायक यांचा तेव्हा त्यांना आधार मिळाला.
असे पडले 'लता' हे नाव -
लतादीदींचे सुरुवातीला 'हेमा' असे नाव होते. मात्र नंतर त्यांच्या वडीलांच्या 'भावबंध' नाटकातील 'लतिका' पात्रावरुन त्यांचे नाव 'लता' असे ठेवण्यात आले. त्यांचे आडनावही गोव्यातील 'मंगेशी'वरुन मंगेशकर असे पडले. त्यांचे मुळ आडनाव 'हर्डिकर' असे होते.
लता दीदींच्या कारकीर्दीची सुरुवात -
लता मंगेशकर यांच्या कारकीर्दीची सुरुवात १९४२ मध्ये झाली. 'पहिली मंगळागौर' या मराठी चित्रपटातील 'नटली चैत्राची नवलाई' हे गाणे त्यांनी स्वरबद्ध केले होते. गायनासोबतच त्यांनी या चित्रपटात छोटी भूमिकाही साकारली होती. १९४५ साली आलेल्या मास्टर विनायक यांच्या पहिल्या सिनेमात 'बडी माँ' या हिंदी सिनेमातही त्यांनी लहानशी भूमिका साकारली होती. १९४९ साली 'महल' चित्रपटातील 'आयेगा आनेवाला' या गाण्यामुळे लतादीदींना वेगळी ओळख निर्माण करुन दिली. अजूनही त्यांचे हे गाणे सर्वात कठीण गाण्यांपैकी एक मानले जाते.
सिनेमांची निर्मिती
लतादीदींनी १९५५ साली आलेल्या 'राम राम पाव्हन' या मराठी सिनेमासाठी पहिल्यांदा संगीतकार म्हणून काम पाहिले होते. त्याचबरोबर लतादीदी निर्मात्याही झाल्या. त्यांनी मराठी, हिंदीत अशा ४ सिनेमांची निर्मिती केली आहे. लतादीदींनी आतापर्यंत २० वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायली आहेत.
मृत्यूच्या दाढेतून बचावल्या होत्या लतादीदी -
लतादीदी गायनाच्या अत्यूच्च शिखरावर असताना त्यांच्यावर मृत्यूची वेळ ओढावली होती. लतादीदींच्या जवळच्या वर्तुळातील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लेखिका पद्मा सचदेव यांनी एक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात या घटनेचा उल्लेख आहे. १९६२ मध्ये लतादीदींवर विषप्रयोग झाला होता. त्यामुळे सुमारे ३ महिने त्या गाऊ शकल्या नव्हत्या. मात्र नंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली आणि त्यांनी पुन्हा गायनाला सुरुवात केली.
आयुष्यभर अविवाहीत राहण्याचा निर्णय -
लता मंगेशकर यांनी आजवर लग्न केले नाही. त्या सर्व भावंडामध्ये मोठ्या आहेत. त्यांच्या वडीलांच्या निधनामुळे कुटुंबाच्या जबाबदारीत त्या एवढ्या गुंतल्या, की वयाच्या एका टप्प्यानंतर त्याना लग्नात काही रस उरला नाही. त्यामुळे त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, की प्रत्येक व्यक्तीला जन्म, मृत्यू आणि लग्न विशिष्ट वेळेलाच येते. जर ते आले नाही, तर ते आपले नव्हतेच, असं समजावं!
लतादीदींचे सुप्रसिद्ध गाणे -
ऐ मेरे वतन के लोगो, ये गलिया ये चौबारा, नैनो मे सपना, देर ना हो जाये, दिल तो पागल है, लग जा गले, मुझे तेरी मोहब्बत का सहाना मिल गया होता, दीदी तेरा देवर दिवाना, यशोमती मैय्या से, गोरी है कलाईया, सोला बरस की बाली उमर को सलाम, दुश्मन ना करे, जिंदगी की ना तुटे लडी, जिंदगी प्यार का गीत है, एक राधा एक मीरा.
हेही वाचा - Lata Mangeshkar Passed Away : लतादिदींच्या काही खास गाण्यांचे खास किस्से