बनिहाल (जम्मू-काश्मीर) - बनिहाल येथून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. येथील एका रुग्णालयात डॉक्टरांनी जन्म झालेल्या चिमुकलीला मृत घोषित केले होते. मात्र, दफन केल्यानंतर एक तासाने ती कबरीत जिवंत आढळली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा - सोने, चांदीच्या दरांमध्ये किंचित वाढ.. बिटकॉइनची घसरण सुरूच, रुपयाचाही किंमत घसरली..
अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुलगी चमत्कारिकरित्या जिवंत सापडल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी सरकारचा निषेध केला. त्याची दखल घेत प्रशासनाने प्रसुती कक्षात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करून चौकशीचे आदेश दिले आहेत.
ही मुलगी बशारत अहमद गुज्जर आणि शमीना बेगम यांची आहे. सोमवारी उप जिल्हा रुग्णालयात सामान्य प्रसुतीत मुलीचा जन्म झाला होता. हे जोडपे रामबन जिल्ह्यातील बनिहालपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या बनकूट गावचे रहिवासी आहेत, अशी माहिती स्थानिक सरपंच मंजूर अल्यास वानी यांनी दिली.
मुलीला मृत घोषित करण्यात आले आणि तिला दोन तास रुग्णालयात कोणत्याही डॉक्टरांनी तपासले नाही, असा आरोप वानी यांनी केला आहे. त्यानंतर कुटुंबाने मुलीला होल्लान गावात दफन करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा हे जोडपे रुग्णालयात परतले तेव्हा काही स्थानिक लोकांनी मुलीला स्मशानभूमीत दफन करण्याचा विरोध केला. यामुळे कुटुंबीयांना सुमारे तासाभरानंतर मुलीला कबरीतून बाहेर काढावे लागले, असे वानी यांनी सांगितले.
जेव्हा मुलीला कबरीतून बाहेर काढले तेव्हा ती जिवंत आढळली, त्यानंतर कुटुंबीय तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. प्रारंभिक उपचारानंतर, मुलीला तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळण्यासाठी श्रीनगरला पाठवण्यात आले, अशी माहिती वानी यांनी दिली.
या घटनेनंतर, मुलीचे कुटुंब आणि इतरांनी रुग्णालयाच्या आवारात डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचार्यांच्या हलगर्जीपणाविरोधात आंदोलन केले. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती बनिहाल ब्लॉक मेडिकल ऑफिसर (बीएमओ) डॉ. राबिया खान यांनी दिली. आम्ही स्त्रीरोग विभागात काम करणारी कनिष्ठ स्टाफ नर्स आणि सफाई कामगाराला तत्काळ निलंबित केले आहे. तपासणीनंतर तपशीलवार माहिती दिली जाईल, अशी माहिती देखील राबिया यांनी दिली.
हेही वाचा - श्रीनगर न्यायालयाने सतीश टिकू हत्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली