मुंबई : देशामध्ये सुरू असलेल्या अनेक समस्या छोट्या पक्षांना दाबण्याचा चाललेला प्रयत्न तसेच ज्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता नाही अशा राज्यांमध्ये केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून दिला जाणारा त्रास याविरोधात एकसंघ लढण्याची गरज केसीआर यांनी मुंबईत व्यक्त केली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना हैदराबादला येण्याचा आमंत्रण दिलं. देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढा देण्यासाठी तयारी सुरू असल्याचं सांगितलं. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी स्वरूप या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांना या आघाडीमध्ये सामील होण्याची विनंती केली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हेही उपस्थित होते. राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन महत्त्वाच्या पक्षांनी केसीआर यांच्या भूमिकेला समर्थन देण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता भविष्यात कशा पद्धतीने विरोधी पक्ष एकत्र येतात याची उत्सुकता असणार आहे.
उद्धव ठाकरेंची भेट
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषद केसीआर यांनी केंद्र सरकारवर टीका केली. देशात केंद्रीय संस्थांचा दुरूपयोग होत असल्याचे ते म्हणाले. तर आमचे हिंदूत्व बदल्याच्या राजकारणाचे नाही, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे, यांनी दिली. दोघांनी यावेळी आगामी काळात देशात तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले.
केसीआर म्हणाले..
देशाच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आलो. उद्धवजींना भेटून प्रसन्न वाटलं. अनेक मुद्द्यांवर आमची सहमती झाली. देशाच्या प्रगतीसाठी, देशाच्या विकासाची गती वाढवण्यासाठी आमची चर्चा झाली. सर्व विषयांवर आम्ही एकजूट झालो आहोत. पुढे एकत्र काम करण्याचं आम्ही ठरवलं. देशात अनेक जण आमच्यासोबत आहेत. काही दिवसात हैदराबाद किंवा अन्य ठिकाणी आम्ही चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने आम्ही मोठा प्रोजेक्त केला. त्याचा आम्हाला फायदा झाला आहे. देशात बदल झाला पाहिजे. देशात परिवर्तनाची गरज आहे, असं तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर म्हणाले.