नवी दिल्ली - अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता प्रस्थापित होत असताना नागरिकांमध्ये भीती आहे. अशा स्थितीत काबुलमध्ये अनेक भारतीय अडकले आहेत. काबुलमधील गुरुद्वारा समितीच्या अध्यक्षांशी संपर्कात असल्याचे दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे (डीएसजीएमसी) प्रमुख मनजिंदर सिंग सिरसा यांनी सांगितले. काबुलमधील गुरुद्वारामध्ये हिंदूसह अनेक शीख थांबले आहेत.
दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे प्रमुख मनजिंदर सिंग म्हणाले, की काबुल गुरुद्वारा समितीच्या अध्यक्षांच्या संपर्कात आहे. गुरुद्वारामध्ये 320 हून अधिक अल्पसंख्यांक असल्याचे गुरुद्वार समितीच्या अध्यक्षांनी सांगितले आहे.
हेही वाचा-गाड्या भरून पैसे घेऊन पळाले अशरफ गनी, रशियाचा खळबळजनक दावा
तालिबानी नेत्यांनी दिली सुरक्षेची ग्वाही
काबुलमधील गुरुद्वारामध्ये गझनीमधील 50 हिंदू आणि 270 हून अधिक जलालबादमधील शीखांचा समावेश आहे. अफगाणिस्तानमधील स्थिती बिघडल्याने त्यांना काबुलमधील कार्टे परवान या गुरुद्वारामध्ये आणण्यात आले आहे. तालबिानी नेत्यांनी त्यांची भेट घेऊन सुरक्षेची ग्वाही दिली आहे. अफगाणिस्तानात राजकीय आणि सैन्यदलामध्ये बदल होत असले तरी हिंदू आणि शीख लोकांच्या जीविताचे संरक्षण होईल, अशी आशा आहे.
हेही वाचा-मोदी सरकारने गाढ झोपेतून जागे व्हावे- अफगाणिस्तानमधील स्थितीवरून काँग्रेसची बोचरी टीका
अफगाणिस्तानमधील भारतीय दुतावासाचे कर्मचारी भारतात पोहोचले...
दरम्यान, भारताने काबुलमधील राजदूत आणि दुतावास कार्यालयातील कर्मचारी हे सैन्यदलाच्या एअरक्राफ्टमध्ये मायदेशात परत आणले आहेत. सैन्यदलाचे सी-17 हे एअरक्राफ्ट हे सकाळी 11 वाजून 15 मिनिटाला गुजरातमधील जामनगर येथे पोहोचले. जामनगरमध्ये विमान पोहोचल्यानंतर अफगाणिस्तानमधील भारताचे राजदूत रुद्रेंद्र टंडन म्हणाले, की तुम्ही स्वागत केल्याने आमच्यावर मोठा परिणाम झाला आहे. भारतीय सुरक्षा दलाने आम्हाला येथे आणल्याने त्यांचे आभारी आहोत. तेथील स्थिती सामान्य नाही.
हेही वाचा-... म्हणून तालिबानी दहशतवाद्यांसमोर अफगाणिस्तानच्या सैन्यदलाने मानली हार
120 भारतीयांना आणले सुरक्षित
सोमवारी रात्री भारताचे C-70 हे विमान 120 भारतीयांना घेऊन परत आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोबतच अफगाणिस्तानचे काही खासदार आणि उच्चायुक्त सुद्धा भारतात पोहोचले. तेथे अडकलेल्या भारतीयांनी एक व्हीडीयो जारी केला आहे. यात एका कोपऱ्यात बसून तेथील भारतीय नागरिक अडचणीत आहेत. याआधी 129 भारतीयांना परत आणले आहे. "माझ्यासोबतच आणखी भारतीय आहेत. आम्ही बाहेर निघू शकत नाही. कारण, बाहेर गोळ्या झाडल्या जात आहेत. येथे चोर आणि लुटारूंची भीती आहे. भारताचे विमान कधी येणार आम्हाला काहीच पत्ता नाही. आम्हाला आधी दुपारी 12.30 ची वेळ देण्यात आली होती. आता दूतावासात कुणी फोन देखील उचलत नाही. आमच्याकडे कसलीही माहिती नाही. विमानतळाबाहेर 4 लाख लोक उभे आहेत. प्लीज आमची मदत करा अशा आशयाचा संदेश सोशल मिडीयावर टाकला आहे.
राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी पैसे घेऊन पळाले-
अफगाणिस्तानचे अमेरिका समर्थक राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी देश सोडताना रिकाम्या हाताने गेले नसून 4 कार आणि एक हेलिकॉप्टर भरून पैसे घेऊन गेल्याचा धक्कादायक दावा रशियाच्या दूतावासाने केला आहे. रशियाची वृत्तसंस्था RIA ने दूतावासातील सूत्रांनी याबाबत माहिती दिली. पैसे जास्त असल्याने काही रक्कम ते विमानतळावरच सोडून गेल्याचेही त्यांनी म्हटले आहे.