गुवाहाटी - 'दिमसा नॅशनल लिबरेशन आर्मी' (डीएनएलए) च्या अतिरेक्यांनी आसामच्या दिमा हसाओ जिल्ह्यातील देओंगमुख येथे पाच ट्रकवर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. हाफलाँगपासून 120 किमी अंतरावर रेंजरबिल परिसरात गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली.
'दिमसा नॅशनल लिबरेशन आर्मी' अतिरेक्यांचा एक गट रेंजरबिल भागात पोहोचला. रात्री 9.8 वाजता, अतिरेक्यांच्या गटाने सिमेंट आणि कोळसा भरलेले ट्रक थांबवले. त्यांनी वाहनांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात पाच ट्रक चालक ठार झाले. गोळीबार केल्यानंतर अतिरेक्यांनी ट्रकमध्ये पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. ट्रकमध्ये किमान 10 लोक होते. ज्यामुळे पोलिसांना संशय आहे, की मृतांची संख्या वाढू शकते. चार ट्रक चालकांची ओळख पटू शकली नाही. एका चालकाची ओळख पटली असून त्याचे नाव गौर मजूमदार असे आहे. ही माहिती दिमा हसाओचे पोलीस अधीक्षक जयंत सिंह यांनी दिली.
काय आहे दिमसा नॅशनल लिबरेशन आर्मी?
यापूर्वी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी 'दिमसा नॅशनल लिबरेशन आर्मी' ने दिमा हसाओ जिल्ह्यातील मैबांग येथे गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी स्वीकारली होती. एप्रिल 2019 मध्ये स्थापन झालेला DNLA, सशस्त्र संघर्षातून दिमासा समुदायासाठी स्वतंत्र देशाची मागणी करतो. अलिकडच्या काही महिन्यांत, सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकींमध्ये संघटनेचे सदस्य मारले गेलेत तर काही शरण आले आले. गेल्या मे महिन्यात आसाममधील नागालँड सीमेवर पश्चिम कार्बी अँगलाँग जिल्ह्यात सुरक्षा दलांशी चकमकीत ‘दिमसा नॅशनल लिबरेशन आर्मी’ या संघटनेचे आठ बंडखोर ठार झाले होते.
हेही वाचा - आसाममध्ये चकमकीत सहा संशयित माओवादी ठार