नवी दिल्ली : मंडोली तुरुंगात बंद असलेला महाठग सुकेश चंद्रशेखर याने रेल्वे मंत्रालयाला पत्र पाठवून ओडिशा रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमींच्या कुटुंबीयांना 10 कोटी रुपयांची मदत देण्याचा प्रस्ताव दिला आहे. सुकेशने आपल्या वकिलामार्फत रेल्वे मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ओडिशातील भीषण रेल्वे अपघातामुळे तो दु:खी आहे. तो मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांना मदत करू इच्छितो.
रक्कम वैध उत्पन्नाच्या स्त्रोतातून दिल्याचा दावा : आपल्या कौटुंबिक मालमत्तेतून 10 कोटी रुपये रेल्वे मंत्रालयाला द्यायचे आहेत, असे त्याने लिहिले आहे. ही रक्कम या अपघातातील पीडितांच्या कल्याणासाठी वापरली जाणार आहे. पत्रात पुढे असे लिहिले आहे की, त्याने ही रक्कम त्याच्या वैध उत्पन्नाच्या स्त्रोतातून दिली आहे. याचा आयकर देखील जमा करण्यात आला आहे. या रकमेच्या कायदेशीर वैधतेबद्दल पडताळणी केली जाऊ शकते. या सोबतच सुकेशने आपल्या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, रेल्वे मंत्री आणि रेल्वे अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.
मुलांच्या शिक्षणासाठी पैसे देणार : सुकेश चंद्रशेखर याने ओडिशात घडलेली रेल्वे दुर्घटना अत्यंत दु:खद असल्याचे म्हटले आहे. यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या मुलांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून ही रक्कम दिली जात आहे. ही रक्कम त्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांचे भविष्य सुधारण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे त्याने म्हटले आहे. त्याने लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने या संपूर्ण मदतकार्यात लक्ष घातले, ते कौतुकास्पद आहे.
रेल्वे मंत्रालयाचेही कौतुक केले : सुकेश याने अपघाताला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईबद्दल रेल्वे मंत्रालयाचेही कौतुक केले आहे. 2 जून रोजी ओडिशातील बालासोर येथे तीन ट्रेनचा अपघात झाला होता. या अपघातात 275 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
हे ही वाचा :