नवी दिल्ली : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखर याने आपल्या वकिलामार्फत दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना आणि पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. तुरुंगात वारंवार विष पाजून जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचे त्याने पत्रात लिहिले आहे. तसेच कारागृह प्रशासनाकडून विविध धमक्या दिल्या जात असल्याचेही त्याने म्हटले आहे.
सुकेशच्या आईलाही धमकीचे फोन : सुकेशने पत्रात आरोप केला आहे की, त्याच्या आईलाही धमकीचे फोन आले आहेत. आईला केलेल्या कॉलमध्ये, सुकेश चंद्रशेखर याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर लावलेले आरोप मागे न घेतल्यास त्याला तुरुंगातील जेवणात विष टाकून जीवे मारले जाईल, अशी धमकी देण्यात आली आहे.
एका आठवड्यात दोनदा धमक्या : सुकेशने नायब राज्यपाल आणि पोलीस आयुक्तांकडे सुरक्षेचे आवाहन केले आहे. जैन यांच्या पत्नी पूनम जैन यांच्याकडूनही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमक्या आल्याचे त्याने पत्रात लिहिले आहे. आमच्या वकिलालाही फोन करून धमकावले जात आहे, असे तो म्हणाला आहे. त्याने म्हटले आहे की, 23 जून आणि 1 जुलै रोजी त्याच्या आईला फोन करून धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वत:ला अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांचा माणूस म्हटले आहे.
'अरविंद केजरीवालांना 9 वर्षांपासून ओळखतो' : सुकेश चंद्रशेखरने लिहिले आहे की, तो अरविंद केजरीवाल यांना 9 वर्षांपासून ओळखतो. तो म्हणाला की, केजरीवाल कायद्याचे राज्य आणि कायदा व सुव्यवस्थेबद्दल बोलतात. पण ते आणि त्यांचे लोकं अशा गोष्टी करत आहेत. त्यांच्या सांगण्यावरून आईला धमकावले जात आहे, जे चुकीचे आहे. त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी पावले उचलली जावीत, असे सुकेशने म्हटले आहे. विशेष म्हणजे या आधीही सुकेश चंद्रशेखरने नायब राज्यपालांना पत्र लिहून याबाबत अनेकदा तक्रार केली आहे.
हे ही वाचा :