नवी दिल्ली : माजी राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी येस बँकेच्या मालमत्तेच्या हस्तांतरणाची चौकशी करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी बँकेची 48,000 कोटी रुपयांची मालमत्ता पुनर्रचना कंपनी जेसी फ्लॉवर्सकडे हस्तांतरित करण्यावर विचार करण्यासाठी तज्ञ समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. याचिकेत स्वामी यांनी दावा केला आहे की, याद्वारे हस्तांतरणात कायद्याला बगल देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच त्यात वस्तुनिष्ठतेचाही अभाव आहे.
न्यायालयाची नोटीस : स्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने शुक्रवारी केंद्र सरकार, भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय), सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी), येस बँक आणि जेसी फ्लॉवर अॅसेट रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडला नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे. नोटिसीला उत्तर देण्यासाठी चारही संस्थांना चार आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीची तारीख 14 जुलै निश्चित करण्यात आली आहे.
तज्ञ समिती स्थापन करण्याची मागणी : स्वामी यांनी जनहित याचिकेमध्ये तज्ञ समिती स्थापन करण्याची तसेच भविष्यात अशा कोणत्याही व्यवहारांची चौकशी करण्याची आणि बँका किंवा इतर वित्तीय संस्था आणि मालमत्ता पुनर्रचना कंपन्यांमध्ये केलेल्या व्यवस्थेचे नियमन करण्याची मागणी केली आहे. याचिकेत असेही म्हटले आहे की, हे हस्तांतरण दुसर्या व्यवहाराशी जोडलेले आहे, ज्यामध्ये येस बँकेने जेसी फ्लॉवर्समधील 19.9 टक्के भागभांडवल विकत घेतले आहेत. येस बँकेच्या ग्राहक आणि भागधारकांच्या किंमतीवर जेसी फ्लॉवर्सचा फायदा व्हावा म्हणून हे व्यवहार केले गेले आणि ते देशाच्या आर्थिक कल्याणासाठी हानिकारक आहेत. तसेच जनतेच्या पैशाच्या वसुलीला ते प्राधान्य देत नाहीत, असे ते म्हणाले.
व्यवहार संशयास्पद : याचिकेत स्वामी म्हणतात की, त्यांना खाजगी बँकिंग क्षेत्रातील वाढत्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करायचा आहे. या संशयास्पद व्यवहाराचा निष्कर्ष टाळण्यासाठी या व्यवहारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. सार्वजनिक पैशांचा गैरवापर होत असल्याने अशा व्यवहारांमुळे देशाच्या आर्थिक आरोग्यावर परिणाम होतो, असा दावा स्वामी यांनी याचिकेत केला आहे. यामध्ये गुंतवणूकदारांच्या विश्वासाशी खेळ करत आरबीआयने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनाही बगल देण्यात आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : Amritpal Singh News : पंजाब पोलिसांना चकमा देऊन पळाला अमृतपाल सिंह, फरार घोषित