नवी दिल्ली - महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) संचालकपदी आज निवड करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांसाठी राहणार आहे.
सीबीआयच्या संचालकपदी सुबोधकुमार जैस्वाल यांची निवड करण्यात आल्याची अधिसूचना आज काढण्यात आली आहे. गतवर्षी डिसेंबरमध्येच तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल केंद्रीय सेवेत जाणार असल्याची चर्चा सुरू होती. जैस्वाल यांनी यांसंदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे विनंती केली होती. ती विनंती मान्यही करण्यात आली होती.
हेही वाचा-ऑलंपिकपटू सुशिल कुमारला दणका..! रेल्वेच्या नोकरीतून केले निलंबित
यापूर्वी जैस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती.
जैस्वाल यांनी केंद्रामध्ये प्रतिनियुक्ती मागितल्याने विरोधी पक्षनेत्यांनी राज्य सरकारवर केली होती टीका
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस डिसेंबर 2020 मध्ये म्हणाले होते, की सुबोधकुमार जैस्वाल हे एक अतिशय कार्यक्षम पोलीस महासंचालक राज्याला लाभले होते. मात्र, पोलीस महासंचालकांना विश्वासात न घेता पोलीस विभागाचा कारभार सुरू आहे. त्यामुळे कंटाळून त्यांनी प्रतिनियुक्ती मागितली, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती
हेही वाचा-मध्यप्रदेशात २६ मे रोजी दिसणार अंशत: चंद्रग्रहण.
कोण आहेत सुबोध कुमार जयस्वाल?
सुबोध कुमार जैस्वालहे 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉमध्ये काम केले आहे. रॉमध्ये त्यांनी 9 वर्षे महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. सुबोध जयस्वाल यांच्याकडे तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा तपास सोपवण्यात आला होता. सुबोधकुमार हे 2006 च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या तपास पथकातदेखील सहभागी होते. मुंबई पोलीस दलात त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले आहे. जुलै 2018 मध्ये सुबोधकुमार यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली होती.
सीबीआयकडे ही काही आहेत राज्यातील महत्त्वाची प्रकरणे-
- माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने अनिल देशमुख, परमबीर सिंग व इतर व्यक्तींची चौकशी केली. त्या चौकशीचा अहवाल सीबीआयच्या विशेष न्यायालयामध्ये सादर करण्यात आला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयकडून गुन्हा नोंदविण्यात आलेला होता. अनिल देशमुख यांच्याशी संबंधित काही ठिकाणी छापेमार देखील करण्यात आली होती. नागपुरमधील अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावर सीबीआयकडून त्यांची तब्बल 7 तास चौकशी करण्यात आली होती. याप्रकरणी अनिल देशमुख यांच्यासह 5 जणांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केलेला आहे.
- शिवसनेचे प्रताप सरनाईक यांच्या लोणावळा येथील बंगल्यावर 18 मे रोजी ईडी व सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.
दरम्यान, न्यायालयाकडून चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत असल्याचा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला होता.