कोटा (राजस्थान) Students Write Wishes On Temple : वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी राजस्थानच्या कोटा येथे जातात. मात्र यातील अनेक मुलं अशी आहेत, जी येथील स्पर्धेमुळं नैराश्याला बळी पडतात. अनेक जण तर नैराश्यामुळं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. याच कोटा शहरात एक मंदिर आहे. या मंदिरावर विद्यार्थ्यांची विशेष श्रद्धा आहे. नैराश्याला बळी पडलेली ही मुलं या मंदिरात जाऊन आपलं मन मोकळं करतात. विद्यार्थी या मंदिराच्या भितींवर आपल्या इच्छा लिहितात. इथे लिहिलेली इच्छा पूर्ण होते, अशी या विद्यार्थ्यांची श्रद्धा आहे.
मुलांना इथे येण्यापासून कोणीही रोखत नाही : कोटाच्या तळवंडी येथील राधाकृष्ण मंदिराच्या भिंती विद्यार्थ्यांच्या मागण्यांनी भरलेल्या आहेत. यामुळे मंदिर प्रशासनाला वारंवार रंगरंगोटीचा खर्च सहन करावा लागतो. मात्र येथे कोणीही मुलांना भिंतीवर लिहिण्यापासून रोखत नाही. मंदिरात सेवा आणि पूजा करणारे पंडित राधेश्याम सांगतात की, मुलांना इथे येण्यापासून कोणीही रोखत नाही. लहान मुलं येथे येऊन देवाचं दर्शन घेतात. त्यांचे कुटुंबीयही येतात. अनेक पालकही इथे आपल्या मागण्या लिहितात, असं त्यांनी सांगितलं.
गेल्या १० ते १५ वर्षांपासून प्रथा सुरू : याबाबत मंदिर समितीचे प्रवक्ते रवी अग्रवाल यांनी अधिक माहिती दिली. 'कोटामधील बहुतेक कोचिंग क्लासेस विज्ञान नगर, जवाहर नगर, शीला चौधरी रोड आणि तलवंडी परिसरात होते. त्यामुळे बहुतेक मुलं इथेच राहायची. सुरुवातीला एक-दोन मुलांनी आपल्या मागण्या भिंतीवर लिहिण्याची प्रथा सुरू केली. हळूहळू ही प्रथा वाढत गेली. आता परीक्षेच्या काळात जवळपास ५०० विद्यार्थी इथे रोज आपल्या मागण्या लिहितात. गेल्या १० ते १५ वर्षांपासून हे नित्यानं सुरू असल्याचं रवी अग्रवाल यांनी सांगितलं.
विद्यार्थी जिथं जागा मिळाली तिथं लिहितात : सुरुवातीला मंदिर समितीनं याला विरोध केला. मंदिराची भिंत घाण करत असल्याचं सांगून त्यांनी मुलांना थांबवलं. मात्र नंतर मुलांचा विश्वास पाहून त्यांनी त्यांना परवानगी दिली. आता मुलं लाकडी कपाटांवर, काचेच्या खिडक्यांवर आणि अगदी टाइल्स आणि संगमरवरी दगडांवरही जिथे जागा मिळेल तिथे लिहितात. लिहिण्यासाठी विद्यार्थी स्केच पेन, मार्कर आणि व्हाईटनरचाही वापर करतात. ज्या विद्यार्थ्यांना खाली जागा मिळत नाही, ते स्टूलचा आधार घेत ७ ते ८ फूट उंचीवरही लिहितात!
पालकही मंदिराला भेट देतात : मंदिर समितीचे अध्यक्ष आरसी अग्रवाल यांनी सांगितलं की, कोटामध्ये दरवर्षी साधारणत: २ लाख मुलं येतात. यापैकी ५० ते ६० हजार मुलं या मंदिरात येतात. जेव्हा परीक्षेची वेळ येते (जानेवारी ते जून) तेव्हा विद्यार्थ्यांची संख्या खूप वाढते. या महिन्यांत दररोज सुमारे २०० मुलं येथे नवस लिहिण्यासाठी येतात. मुलांचे पालकही कोटा येथे आल्यावर हे मंदिर पाहायला येतात. या विद्यार्थ्यांमध्ये 'नीट' आणि 'जेईई' तसेच इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे, असं त्यांनी सांगितलं.
अनेक भाषांमध्ये मागण्या लिहिल्या आहेत : राधाकृष्ण मंदिर समितीचे अध्यक्ष गोविंद नारायण म्हणतात की, येथे विद्यार्थी प्रत्येक भाषेत लिहून जातात. येथे हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त मल्याळम, तेलुगु, मराठी, ओडिया, आसामी आणि बंगाली भाषांमध्येही मागण्या लिहिल्या जातात. गोविंद नारायण असेही सांगतात की येथे अनेक मुस्लिम विद्यार्थीही येतात. ते उर्दूमध्ये मागण्या लिहून जातात, असं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा :