पुणे - भोपाळ मतदारसंघात निवडून आलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना पुण्यातल्या प्रसिद्ध एमआयटी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या 'स्कूल ऑफ गव्हरमेंट'मध्ये आयोजित वेबिनारमध्ये आमंत्रित करण्यात आले. या वेबिनारवरून वादंग निर्माण झाला असून काही विद्यार्थी संघटनांनी त्याला विरोध केला आहे.
'भारतीय छात्र संसद’ हा देशभरात गाजलेला उपक्रम -
एमआयटी विश्वशांती विद्यापीठाअंतर्गत विविध विषयांचे अभ्यासक्रम चालवले जातात. स्कूल ऑफ गव्हरमेंटमध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि संस्कृतिक क्षेत्रातील देशभरातील दिग्गज मान्यवर मार्गदर्शनासाठी येत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून याअंतर्गत भारतीय छात्र संसद हा देशभरात गाजला आहे. या उपक्रमांला देशाच्या कानाकोपार्यातील विद्यार्थांनी मोठा प्रतिसाद दिला होता.
प्रज्ञा सिंह ठाकूर यांना विद्यार्थी संघटनांचा विरोध -
साध्वी प्रज्ञा यांच्यासारख्या बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी असलेली व्यक्ती 'एमआयटी स्कुल ऑफ गव्हरमेंट' च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असतील तर निषेधार्थ आहे. त्यांच्यावर मोक्काही लावण्यात आला होता. धर्मांध आणि विखारी वक्तव्य करणार्या, सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करणार्या, शहिद हेमंत करकरे यांचा अपमान करणार्या व्यक्तीला मार्गदर्शन करायला लावून एमआयटीला काय साध्य करायचं आहे? असा सवाल विद्यार्थी संघटनेचे कुलदीप आंबेकर यांनी उपस्थित केला आहे. साध्वी प्रज्ञा सिंह यांची पार्श्वभूमी माहित असूनही त्यांना का बोलवण्यात आलं, असा सवाल विद्यार्थी संघटनांनी केला आहे.
इंग्रजी शिक्षणामुळे गुलामीची मानसिकता -
भारतीय संस्कृतीत 'वसुधैव कुटुंबकम' ची परंपरा आहे. मात्र, हिंदुत्व आणि भगव्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. इंग्रजी शिक्षण, व्यवहारामुळे गुलामीची मानसिकता निर्माण होते. आपल्या धर्मामध्ये कामानुसार असलेल्या जातीमध्ये इंग्रजांनी फूट पाडून देशातील हिंदूंना विभाजित करून शासन केले. हिंदू एक झाले असते, तर भारतावर कोणीही राज्य करू शकले नसते. आपल्या पिढीला सुधारण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. देशविरोधी विचारधारेविरोधात कारवाई करणे गरजेचे असल्याचे खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भाषणात सांगितले.
हेही वाचा - पुण्यातील एमआयटी विद्यापीठ विरोधात अभाविपचे 'विमान उडाव' आंदोलन