चंदीगड (पंजाब): पंजाब पोलिसांनी खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगला ३६ दिवसांनंतर अखेर अटक केली असून, याबाबत पोलिसांनी अखेर अमृतपाल सिंग याला अटक करण्याची कारवाई कशी झाली याबाबत माहिती दिली आहे. एका पत्रकार परिषदेत पंजाब पोलिसांचे आयजी सुखचैन सिंग गिल यांनी माहिती दिली की, अमृतपालला आज सकाळी मोगा येथील रोडे गावातून अटक करण्यात आली आहे. आयजी सुखचैन सिंह यांनी सांगितले की, पंजाब पोलिसांच्या सर्व शाखा एकत्र काम करत आहेत. अमृतपाल सिंग याच्याविरोधात एनएसए अंतर्गत अटक वॉरंट जारी करण्यात आले होते.
पवित्रता जपून केली कारवाई: त्यांनी सांगितले की, अमृतपालला आज सकाळी ६.४५ वाजता मोगा जिल्ह्यातील रोडे गावातून अटक करण्यात आली. आयजींनी सांगितले की, पोलिसांना अमृतपाल गुरुद्वारामध्ये उपस्थित असल्याची गुप्तचर माहिती मिळाली होती, त्यानंतर पंजाब पोलिस आणि गुप्तचर यंत्रणांनी संपूर्ण गावाला वेढा घातला होता. गुरुद्वाराची प्रतिष्ठा, पवित्रता लक्षात घेऊन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
अटक किंवा आत्मसमर्पण: सुखचैन गिल यांना विचारण्यात आले की, अमृतपालने आत्मसमर्पण केल्याचे किंवा त्याला अटक करण्यात आल्याचे वृत्त नेमके आहे का? यावर आयजी गिल म्हणाले की, अमृतपालकडे दुसरा पर्याय नव्हता. आयजी म्हणाले की, अमृतपालने आत्मसमर्पण केले नाही, परंतु पोलिसांकडे असे इनपुट होते की तो गुरुद्वारामध्ये उपस्थित होता, त्यानंतर पोलिसांनी केंद्रीय यंत्रणांच्या समन्वयाने ऑपरेशन केले. गुरुद्वाराची प्रतिष्ठा लक्षात घेऊन पोलिसांनी ही संपूर्ण कारवाई केली आहे.
अन्यथा कारवाईचा इशारा: आयजी सुखचैन सिंह यांनी सांगितले की, अमृतपालची आसाममधील दिब्रुगड तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. काही समाजकंटकांना पंजाबचे वातावरण बिघडवायचे आहे. अशा परिस्थितीत त्यांनी असे करू नये, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. अमृतपाल सिंग याच्या अटकेनंतर आता पंजाबमधील वातावरण बिघडू नये, यासाठी पोलिसांकडून मोठी खबरदारी घेण्यात येत आहे.