हरिद्वार - अभिनेता अनिल कपूरच्या 'नायक' चित्रपटाची पुनरावृत्ती आज उत्तराखंडमध्ये होणार आहे. सृष्टी गोस्वामी ही मुलगी उत्तराखंड राज्याची एक दिवसाची मुख्यमंत्री बनणार आहे. कन्या दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी या उपक्रमाची सुरुवात केली आहे. विविध सरकारी विभाग एक दिवसाच्या मुख्यमंत्र्याला कामाचा अहवाल सादर करणार आहे. मुलींचे महत्त्व पटवून देण्यासाठी या उपक्रम सरकारने सुरू केला आहे.
अधिकारी देणार कामकाजाची माहिती -
राज्यात बाल विधानसभेचेही आयोजन केले जाणार आहे. यामध्ये अनेक सरकारी विभाग सहभागी होणार आहेत. सृष्टी गोस्वामी ती मुलगी हरीद्वार जिल्ह्यातील असून सर्वसामान्य घरातील आहे. तिचे वडील प्रवीण पूरी एक किराणा दुकान चालवतात. तर आई गृहिणी आहे. आपली मुलगी एक दिवसाची मुख्यमंत्री होत असल्याने कुटुंबीयांना अत्यंत आनंद होत आहे. २०१८ साली सृष्टी गोस्वामीला बाल आमदारही करण्यात आले होते.
उत्तराखंडच्या बाल संरक्षण आयोगाने हा उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घेतला होता. मुख्य सचिव ओमप्रकाश यांना आयोगाने एक पत्र लिहले होते. मुख्यमंत्री म्हणून सृष्टी एक दिवस सर्व कामांचा आढावा घेणार आहे. तसेच सर्व विभागाचे अधिकारी बाल मुख्यमंत्र्यांपुढे पाच मिनिटांचे प्रेझेंटेशन सादर करणार आहे. मुलींना येणाऱ्या अडचणीसंबंधी अधिकाऱ्याना सुचना देणार असल्याचे सृष्टीने ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
मुलींना पुढे जाण्यापासून कोणीही अडवू नये -
मुलींना पुढे जाण्यापासून कोणीही अडवू नये हा संदेश यातून जात असल्याचे सृष्टीची आई सुधा गोस्वामी म्हणाली. मुलगा आणि मुलगी दोघांनाही एकसारखीच संधी, प्रेम आणि सन्मान द्यायला हवा, असेही त्या म्हणाल्या. कन्या दिनी समाजात जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.