हैदराबाद : स्पुटनिक-५ या रशियन कोरोना लसीची भारतातील दुसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वीपणे पार पडली आहे. स्वतंत्र डेटा आणि सुरक्षितता देखरेख बोर्डाने (डीएसएमबी) या चाचणीचा अहवाल तपासून, पुढील टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी दिली आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने याबाबत माहिती दिली.
डीएसएमबीची परवानगी..
स्पुटनिक-५ची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी १०० लोकांवर केली गेली होती. यामधील स्वयंसेवकांवर कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत. सुरक्षेचे प्राथमिक निकष गाठण्यात या लसीला दुसऱ्या टप्प्यात यश मिळाले असून, लसीमध्ये कोणतेही बदल न करता, तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरू करण्यास डीएसएमबीने परवानगी दिली आहे.
डीसीजीआयचा होकार बाकी..
यासोबतच, लसीच्या चाचणीचा अहवाल डीसीजीआयकडे जमा करण्यात आला असून, आता डीसीजीआयकडून तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी मागण्यात आली आहे. डीसीजीआयचा होकार मिळताच तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू करणार असल्याचे रेड्डीज लॅबने स्पष्ट केले.
भारतात लवकरात लवकर ही लस आणण्याचा प्रयत्न..
या निर्णयामुळे आमचा आत्मविश्वास वाढला असल्याचे मत डॉ. रेड्डीज लॅबचे एमडी आणि सह-अध्यक्ष जी. व्ही. प्रसाद यांनी व्यक्त केले. आतापर्यंत रशियामधील दहा लाख, तर अर्जेंटिनामधील तीन लाखांहून अधिक लोकांना आतापर्यंत स्पुटनिक-५ लस देण्यात आली आहे. आम्ही लवकरात लवकर भारतात ही लस आणण्याचा प्रयत्न करत असल्याचेही प्रसाद यांनी सांगितले.
रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे (आरडीआयएफ) मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दिमित्रेव्ह यांनी भारतातील अहवाल पाहून समाधान व्यक्त केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही स्पुटनिक-५ सुरक्षितच असल्याची ही पावती असल्याचे ते म्हणाले. रशिया सरकार आणि आरडीआयएफने संयुक्तरित्या स्पुटनिक-५ ही लस तयार केली आहे. तर, भारतात याची चाचणी आणि वितरण करण्याचे हक्क डॉ. रेड्डीज लॅबने घेतले आहेत.
हेही वाचा : तयारी लसीकरणाची: सीरम कंपनीची 'कोविशिल्ड' लस देशभरात दाखल