नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर असून मृत्यूच्या संख्येत वाढ होत चालली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण अत्यंत गरजेचे आहे. देशातील प्रत्येकाला लस मिळावी म्हणून रशियाच्या स्पूटनिक व्ही लसीला देशात मंजुरी देण्यात आली आहे. देशभरातील अपोलो रुग्णालयांमध्ये 'स्पूटनिक व्ही' ही कोरोना लस देण्यात येणार आहे, असे अपोलो ग्रुप ऑफ रुग्णालयाने जाहीर केले आहे.
स्पूटनिक व्ही लशीची किंमत अपोलो रुग्णालयात 1 हजार 195 रुपये असणार आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून अपोलो रुग्णालयामध्ये स्पूटनिक व्ही लस मिळेल. स्पूटनिक व्ही लसीची किंमत 995 रुपये आहे. तर वरील 200 रुपये प्रशासन शुल्क आहे.
अपोलो गटाने देशातील 80 ठिकाणी 10 लाख कोरोना लस टोचवण्याचे काम पूर्ण केले आहे. फ्रंटलाइन कामगार, कोरोनाचा जास्त धोका असलेले नागरिक कॉर्पोरेट कर्मचार्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे अपोलो ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या कार्यकारी उपाध्यक्ष शोभना कामिनेनी यांनी सांगितले.
जूनमध्ये प्रत्येक आठवड्यात एक मिलियन लोकांना लस टोचवण्यात येईल. तर जुलैमध्ये ही संख्या डबल होईल. स्पटेंबरपर्यंत आम्ही 20 मिलियन लोकांना लस टोचवण्याचे लक्ष्य पूर्ण करण्याकडे आमची वाटचाल असेल, असेही शोभना कामिनेनी यांनी सांगितले.
स्पूटनिक व्ही लशीबाबत महत्त्वाचे मुद्दे -
- 11 ऑगस्ट रोजी जगातील प्रथम कोविड - 19 लसीची नोंदणी करणारा रशिया हा पहिला देश ठरला. रशियाच्या या लसीचे नाव स्पुटनिक व्ही. असून ते रशियाच्या पहिल्या उपग्रहाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.
- स्पूटनिक व्ही भारतामध्ये उपलब्ध होणारी कोरोनावरील तिसरी लस असणार आहे. यापूर्वी भारताने भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सीरमची कोव्हिशिल्ड या लशीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.