नवी दिल्ली Spicejet Ayodhya Flight : स्पाईसजेटनं 1 फेब्रुवारी 2024 पासून अयोध्येला चेन्नई, बेंगळुरू आणि मुंबईहून नॉन-स्टॉप उड्डाणं सुरू करण्याची घोषणा केली. या मार्गांवर विमान कंपनी आपली 189 आसनी बोईंग 737 विमानं चालवणार आहे.
अयोध्येसाठी विशेष विमान : एअरलाइन ऑपरेटरनं जाहीर केलं की, ते 21 जानेवारीला दिल्ली ते अयोध्येसाठी विशेष विमान चालवतील. 22 जानेवारी रोजी राम मंदिरातील 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या प्रवाशांसाठी हे विशेष विमान आहे. स्पाइसजेट त्याच दिवशी परतीचं उड्डाण देखील चालवेल. दिल्लीहून विशेष विमान दुपारी 1.30 वाजता निघून अयोध्येत दुपारी 3 वाजता पोहोचणार आहे. दुसऱ्या दिवशी परतीची फ्लाइट संध्याकाळी 5 वाजता निघेल आणि संध्याकाळी 6:30 वाजता दिल्लीला पोहोचेल.
नवीन उड्डाणं जाहीर : याशिवाय, स्पाइसजेटनं 1 फेब्रुवारीपासून मुंबई ते श्रीनगर, चेन्नई ते जयपूर आणि बेंगळुरू ते वाराणसी यांना जोडणारी नवीन उड्डाणं जाहीर केली. स्पाइसजेटच्या मुख्य व्यावसायिक अधिकारी शिल्पा भाटिया यांनी सांगितलं की, ही नवीन उड्डाणं कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी आणि प्रवाशांना सोयीस्कर प्रवास पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आहेत.
आणखी शहरांना अयोध्येशी जोडणार : स्पाईसजेट लवकरच आणखी भारतीय शहरांना अयोध्येशी जोडणार आहे. तसेच अखंड आणि आरामदायी प्रवासासाठी नॉन-स्टॉप फ्लाइट ऑफर करण्यात येणार आहे. हा विस्तार स्पाईसजेटच्या प्रादेशिक कनेक्टिव्हिटीच्या वाढीस हातभार लावेल, असं एका एअरलाइन अधिकाऱ्यानं सांगितलं. कंपनी लवकरच नवीन मार्गांबद्दल अधिक तपशील शेअर करेल, असं एका निवेदनात म्हटलंय. 22 जानेवारीला होणाऱ्या अभिषेक सोहळ्यासाठी अयोध्या विमानतळावर सुमारे 100 चार्टर्ड उड्डाणं अपेक्षित आहेत.
हे वाचलंत का :