नवी दिल्ली Soumya Viswanathan Murder Case : पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्येप्रकरणी न्यायालयानं बुधवारी (१८ ऑक्टोबर) महत्वाचा निकाल दिला. दिल्लीच्या साकेत न्यायालयानं या प्रकरणातील सर्व आरोपींना दोषी ठरवलं आहे. आता या आरोपींना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका-MCOCA) अंतर्गत शिक्षा सुनावण्यात येईल.
पाचही आरोपी दोषी : साकेत न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश रवींद्र कुमार पांडे यांनी आपल्या निकालात सांगितलं की, सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबाच्या आधारे हे सिद्ध झालं की, आरोपी रवी कपूर, अमित शुक्ला, अजय कुमार आणि बलजीत मलिक यांनी दरोडा टाकण्याच्या उद्देशानं सौम्या विश्नाथन यांची हत्या केली होती. या सर्वांना कलम ३०२ आणि ३४ शिवाय मकोका अंतर्गत दोषी ठरवण्यात आलंय. न्यायालयानं या प्रकरणातील पाचवा आरोपी अजय सेठी याला भारतीय दंड संहितेच्या कलम ४११ अंतर्गत आक्षेपार्ह वाहन बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. न्यायालयानं म्हटलं की, त्यानं गुन्ह्यात मदत केली आणि गुन्ह्यातून मिळवलेल्या मालमत्तेचा ताबा घेतला. त्यालाही मकोका अंतर्गत दोषी ठरवण्यात आलं आहे.
काय आहे प्रकरण : ३० सप्टेंबर २००८ रोजी दिल्लीतील वसंत कुंज परिसरात पत्रकार सौम्या विश्वनाथन यांची हत्या करण्यात आली होती. वसंत कुंज येथील नेल्सन मंडेला मार्गावर त्यांच्या कारमध्ये त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. विश्वनाथन त्यावेळी एका खाजगी वाहिनीत काम करत होत्या. पहाटे साडेतीन वाजता कामावरून घरी परतत असताना त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येमागे दरोडा हा हेतू होता, असा दावा पोलिसांनी केला.
आरोपींविरुद्ध 'मकोका' लावला : या प्रकरणी पोलिसांनी रवी कपूर, बलजीत मलिक, अमित शुक्ला, अजय कुमार आणि अजय सेठी या पाच जणांना अटक केली होती. ते मार्च २००९ पासून कोठडीत होते. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लावला होता.
हेही वाचा :
- Nithari Case : कोवळ्या मुलांचा बळी घेतलेलं निठारी हत्याकांड; आरोपी सुरेंद्र कोली, मोनिंदर सिंह पंढेर यांची निर्दोष मुक्तता
- Delhi Crime News : 20 वर्षानंतर दुहेरी खून प्रकरणात नौदलाच्या माजी कर्मचाऱ्याला अटक, पोलिसांना 'असा' दिला होता चकवा
- Mahadev Book App Scam : ऑनलाईन अॅपद्वारे कोट्यवधींची सट्टेबाजी करणाऱ्या टोळीच्या मास्टरमाइंडला मुंबई विमानतळावरून अटक