बंगळुरू - अभिनेता सोनू सूद कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही अनेकांना मदत करत आहे. सोनू सूद चॅरिटेबल ट्रस्टच्या सदस्यांनी वेळेवर ऑक्सिजन सिलिंडर पुरविल्याने कर्नाटकमधील दहाहून अधिक कोरोनाबाधितांचे प्राण वाचले आहेत.
येलाहानका येथील अर्का खासगी रुग्णालयात दहाहून अधिक कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. मात्र, ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने दोन कोरोनाबाधित दगावले आहेत. अर्का रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ येलाहानका न्यूटन पोलिसांना ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचे कळविले. पोलीस निरीक्षक सत्यनारायणन हे आर्का रुग्णालयात पोहोचले. त्यांनी सोनू सूद ट्रस्टच्या सदस्यांशी संपर्क साधला. त्यावर ट्रस्टच्या सदस्यांनी तात्काळ प्रतिसाद देत दुचाकी व कारमधून 11 ऑक्सिजन सिलिंडर पोहोचविले. त्यामुळे कोरोनाबाधितांना तत्काळ ऑक्सिजन मिळू शकला आहे. जर ऑक्सिजन सिलिंडर वेळेवर पोहोचला नसता अतिदक्षता विभागात उपचार सुरू असलेल्या कोरोनाबाधितांचे प्राण गेले असते. कोरोनाबाधितांना वेळेवर ऑक्सिजन पुरविणाऱ्या सोनू चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य अश्मत, राधिका, राघव व इतरांचे कौतुक करण्यात येत आहे.
हेही वाचा-धक्कादायक! हैदराबादमधील नेहरु प्राणीसंग्रहालयातील 8 सिंहांना कोरोना
सोनू सूदकडे देशभरातून मागितली जाते मदत
दरम्यान, देशभरातून कोरोनाबाधितांवरील उपराचाराकरिता सोनू सूदकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मागितली जाते. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील एका मजुराला कोविड पॉझिटिव्ह असताना दवाखान्याची भटकंती करूनही बेड मिळत नव्हता. तर दुसरीकडे रुग्णाची प्रकृती खालावत चालली होती. यात ट्विटरवर अभिनेता सोनू सूदला मदत मागितली. त्याने 15 मिनिटात बेड मिळेल असे सांगितले आणि अवघ्या काही वेळातच बेड उपलब्ध झाला. या सर्वात मुंबईत बसून, एका गरीब मजुरांसाठी सोनू सूदने जे केले, ते इतर राजकीय नेत्यांना जमणार का? हा प्रश्नही नागरिक विचारत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मजुरांना घरी पोहोचण्यासाठी सोनू सूदने ट्रॅव्हल्स उपलब्ध करून दिल्याने त्याचे कौतुक झाले होते.
हेही वाचा-दिल्लीमधील बेस रुग्णालयाला ऑक्सिजनचा कमी पुरवठा; सैन्यदलाची सरकारकडे तक्रार