नवी दिल्ली- मोदी सरकारने महामारीकडे दुर्लक्ष केल्याने देशाला भयानक किंमत मोजावी लागत असल्याची काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी टीका केली. त्यांनी काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत कोरोना संकटाच्या व्यवस्थापनावरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
काँग्रेसच्या कार्यकारी समितीची (सीडब्ल्यूसी) आज बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना सोनिया गांधी यांनी नुकतेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीबाबत चर्चा केली. यावेळी सोनिया गांधी म्हणाल्या, की आपण कार्यकारी समितीची बैठकीत १७ एप्रिलला भेटलो होतो. गेल्या चार आठवड्यांत कोरोना महामारीची स्थिती आणखी विनाशकारी झाली आहे. प्रशासन आणखी अपयशी ठरले आहे.
हेही वाचा-'भाजपशासित राज्यांमध्ये कोरोना मॅनेजमेंट केवळ जाहिरातींमध्येच'
पक्षीय हितासाठी सुपर स्प्रेडर कार्यक्रमांकडे दुर्लक्ष
वैज्ञानिक सल्ल्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. मोदी सरकारने दुर्लक्ष केल्याने देशाला भयानक किंमत मोजावी लागत आहे. सुपर स्प्रेडरसारख्या कार्यक्रमांना जाणीवपूर्वक पक्षाच्या फायद्यासाठी संरक्षण देण्यात आले. अनेक वैज्ञानिकांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी संपूर्णपणे लॉकडाऊन घोषित केल्याचे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा-बक्सरमध्ये गंगेकिनारी आढळले सुमारे ५० मृतदेह; पाहा विदारक दृश्य
विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांना भेदभावाची वागणूक-
देशातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा कोसळली आहे. ज्या वेगाने अपेक्षित आहे, त्या वेगाने लसीकरण होत नाही. मोदी सरकारने जबाबदारी सोडली आहे. त्यामुळे राज्यांना १८ ते ४५ वयोगटासाठी कोट्यवधी डोस देण्याकरता खर्च सोसावा लागणार आहे. केंद्र सरकारने लसीकरणाचा खर्च उचलावा असे तज्ज्ञ सांगत आहे. मात्र, मोदी सरकारचे प्राधान्य दुसऱ्या गोष्टींकडे असल्याचे आपल्याला माहित आहे. लोकांच्या इच्छेविरोधात आणि मोठ्या प्रमाणात टीका होतानाही मोठे प्रकल्प केले जात आहेत. विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांना भेदभावाची वागणूक सुरूच आहे. ही केंद्र सरकारसाठी लाजिरवाणी बाब असल्याची घणाघाती टीका काँग्रेसच्या अध्यक्षांनी केली.
हेही वाचा-दोन मंत्र्यांच्या मतदारसंघातच कोरोना लसींचा तुटवडा; नागरिकांचा संताप अनावर
सर्वपक्षीय बैठक बोलवावी
सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. तातडीच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या कामांसाठी काँग्रेस सरकारबरोबर असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे. जगभरातून कोरोनाच्या संकटात मदत करणाऱ्या आंतरराष्ट्रीय समुदायाचे सोनिया गांधी यांनी बैठकीत आभार मानले आहेत.