नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये ममतांनी आपली सत्ता कायम राखली आहे. तर, तामिळनाडूमध्ये सत्ताधारी अण्णाद्रमुकला नमवत द्रमुकने सत्ता काबीज केली आहे. या विजयानंतर काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांना फोन करत शुभेच्छा दिल्या.
बंगालमध्ये जिथे भाजपा २००हून अधिक जागांवर जिंकण्याचा दावा करत होतं, तिथं त्यांना केवळ ७७ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. ममतांनी २००हून अधिक जागा मिळवत आपली सत्ता कायम राखली आहे. तृणमूल आणि भाजपाच्या या लढाईमध्ये काँग्रेस आणि डाव्यांचा धुव्वा उडालेला पहायला मिळाला आहे.
दुसरीकडे तामिळनाडूमध्ये दहा वर्षं विरोधी पक्षात राहिलेल्या द्रमुकला यावेळी लोकांनी संधी दिली आहे. द्रमुक आघाडीला एकूण १५९ जागांवर विजय मिळाला आहे. तर अण्णाद्रमुकला केवळ ७५ जागांवर समाधान मानावे लागले. या निकालामुळे स्टॅलिन यांच्यावरील लोकांचा विश्वास सिद्ध झाला आहे.
रविवारी केरळ, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. यांमधील पुद्दुचेरी आणि आसाम वगळता इतर तीन राज्यांमध्ये भाजपचा दारुण पराभव झालेला पहायला मिळाला. तसेच, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी वगळता इतर तीन ठिकाणी आहे त्याच पक्षाने सत्ता पुन्हा मिळवली.
हेही वाचा : तामिळनाडूमध्ये सत्तांतर! तब्बल दहा वर्षांनंतर उगवला 'द्रमुक'चा सूर्य!