चंडीगढ - पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींबाबत काँग्रेसकडून भाजपाला लक्ष्य करण्यात येत आहेत. यातच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार यांना इशारा दिल्यानंतर देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. यावरून हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. नाना पटोले यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अभिनेता अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांची माफी मागावी, अशी मागणी अनिल विज यांनी केली.
विरोधी पक्षांची अर्थपूर्ण भूमिका निभावण्यात अक्षम असणारे नेते आता चित्रपटातील कलाकारांनाही लक्ष्य करीत आहेत. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यासारख्या देशातील प्रतिष्ठित लोकांना धमकी देत आहेत. काँग्रेसच्या अंपगत्वाचे आणि पोकळपणाचे हे सूचक आहे, असे अनिल विज यांनी टि्वट करून म्हटलं. तसेच त्यांनी नाना पटोले यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
काय म्हणाले होते नाना पटोले?
पेट्रोल, डिझेल दरवाढीने नागरिक त्रस्त झाले आहेत. सामान्य नागरिकांनी कसे जगावे हा खरे तर प्रश्न आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या सरकारच्या काळात सिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार टि्वटरच्या माध्यमातून टिव टिव करायचे. सरकारवर ट्विटच्या माध्यमातून टीका करायचे. शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र आता त्यांनादेखील विसर पडला आहे, अशी नाना पटोले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती.
नाना पटोले यांच्या वक्तव्याला शिवसेनेचा पाठिंबा -
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. त्यांनी अभिनेत्यांवर टीका केल्यानंतर आमदार राम कदम, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. तर शिवेसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी नाना पटोलेंच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.