नवी दिल्ली - पेगॅसस हेरगिरी प्रकरणामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या प्रकरणी आता भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. पेगॅससचा अहवाल ठिक पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वीच कसा आला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच त्यांनी एमनेस्टीवरही शंका उपस्थित केली आहे. एमनेस्टीचा भारत विरोधी अजेंडा जगजाहिर असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी काँग्रेसने केलेले आरोप निराधार असल्याचेही म्हटले. दरम्यान, लोकसभेत आईटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात भूमिका जाहीर केली असल्याचेही ते म्हणाले.
'एमनेस्टीचा भारत विरोधी अजेंडा जगजाहीर' -
यावेळी रविशंकर प्रसाद यांनी एमनेस्टीवर गंभीर आरोपही केले. एमनेस्टीचा भारत विरोधी अजेंडा जगजाहिर असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच एमनेस्टीला भारत सरकारने त्यांच्या विदेशी फंडींगबाबत विचारले असता, त्यांनी भारतातून आपला गाशा गुंडाळला, असेही ते म्हणाले.
पेगॅससवरून राजकीय वातावरण तापले -
यामुद्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेससह विरोधीपक्षांनी संसदेत या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी 28 नोव्हेंबर 2019 रोजी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पेगॅससबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. तसेच राज्यसभा सदस्य सुब्रम्हण्यम स्वामी यांनी सरकारने याबाबत खुलासा करावा, अशी मागणी केली आहे.
काय आहे पेगासस सॉफ्टवेअर -
पेगासस हे एक स्पायवेअर आहे. इस्त्रायलच्या NSO ग्रुपने हे स्पायवेअर बनवलं आहे. ज्याद्वारे आयफोन आणि अँड्रॉइड डिव्हाइस हॅक केले जाऊ शकतात. यासह, मालवेअर पाठविणारे त्या फोनचे संदेश, फोटो आणि अगदी ई-मेल पाहू शकतात.