सुलतानपूर - आंतरराष्ट्रीय नेमबाज वर्तिका सिंग यांना राज्य महिला आयोगाचा सदस्य बनविण्यासाठी 25 लाखांची लाच मागितल्याच्या प्रकरणात केंद्रीय मंत्री स्मृती इराणींसमोरील अडचणींत वाढ झाली आहे. हे प्रकरण एमपी एमएलए न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर हायकोर्टाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे खासगी सचिव आणि भाजपा नेते विजय गुप्ता यांच्याविरोधात शुक्रवारी नोटीस जारी करण्यात आली आहे.
शुक्रवारी उच्च न्यायालयात वर्तिका सिंग प्रकरणाची सुनावणी झाली. 23 डिसेंबर 2020 रोजी वर्तिका सिंग यांनी सुलतानपूरच्या न्यायालयात 156/3 अंतर्गत तक्रार दाखल केली होती. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे खाजगी सचिव विजय गुप्ता आणि अयोध्या येथील रहिवासी डॉ. रजनीश सिंग यांनी राज्य महिला आयोगाचे सदस्य बनवण्यासाठी 25 लाखांची लाच मागितल्याचा आरोप वर्तिका यांनी केला होता.
याप्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली आणि 20 फेब्रुवारीला कोर्टाने पुरावा नसल्यामुळे दाखल केलेली तक्रार फेटाळून लावली होती. यावर वर्तिका यांनी लखनऊ न्यायालयात याला आव्हान दिले. शुक्रवारी सुनावणी घेत उच्च न्यायालयाने सर्व आरोपींना 26 जुलैपर्यंत निवेदने नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाने संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. आम्ही सर्व पुरावे कोर्टाला दिले आहेत. यात केंद्रीय मंत्र्यांची ऑडिओ रेकॉर्डिंगही न्यायालयात देण्यात आली आहे, असे वर्तिका यांचे वकिल अरविंदसिंग राजा यांनी सांगितले.