बंगळुरू : भाजपा नेते रमेश जारकीहोली यांच्या कथित सेक्स सीडी प्रकरणी विशेष तपास पथकाकडून चौकशी केली जात आहे. यामध्ये आता या सीडीमधील महिलेने उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहिले आहे. यामध्ये तिने प्रकरणाच्या तपासासह आणखी मागण्या केल्या आहेत.
"माझ्या आई-वडिलांकडून जबरदस्ती जवाब नोंदवून घेण्यात आला. रमेश जारकीहोली हे मोठे नेते आहेत आणि त्यांनी सर्वांसमोर आम्हाला धमकी दिली आहे. त्यामुळे मला आणि माझ्या आई-वडिलांना संरक्षण देण्यात यावे." असेही तिने आपल्या पत्रामध्ये लिहिले आहे.
काय आहे प्रकरण?
दोन मार्च रोजी एक व्हिडिओ माध्यमांमध्ये समोर आला होता. या व्हिडिओमध्ये रमेश जारकीहोली हे एका महिलेसह आक्षेपार्ह परिस्थितीत दिसून येत आहेत. या महिलेला नोकरी देण्याच्या निमित्ताने रमेश यांनी या महिलेचे शोषण केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लाहल्ली यांनी केला होता. यानंतर तीन मार्चला जारकीहोळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तर कल्लाहल्ली यांनी सहा मार्चला आपली तक्रार मागे घेतली होती.
दरम्यान, याप्रकरणी एसआयटीने काही जणांना अटकही केली होती. तर येदीयुरप्पा सरकारमधील सहा मंत्र्यांनी माध्यमांविरोधात बंगळुरू उच्च न्यायालयात धाव घेतली होती. माध्यमांनी आपली बदनामी होईल असे काही प्रदर्शित करू नये अशी या मंत्र्यांची मागणी होती.
हेही वाचा : केजरीवालांना मोठा धक्का; GNCTD विधेयक राष्ट्रपतींकडून मंजूर