शिवकाशी (तामिळनाडू) Sivakasi Firecracker Blast : तामिळनाडूतील शिवकाशी शहर फटाका उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक छोटे-मोठे फटाके कारखाने आहेत. मंगळवारी (१७ ऑक्टोबर) येथे एक दु:खद घटना घडली. मंगळवारी शिवकाशी शहर दोन वेगवेगळ्या स्फोटांनी हादरलं. या स्फोटात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला असून १५ हून अधिक कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
कनिष्कर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट : पहिला स्फोट एम. बुधुपट्टी रेंगापलायम परिसरात असलेल्या कनिष्कर फटाक्यांच्या कारखान्यात झाला. त्यावेळी तेथे १५ हून अधिक कामगार काम करत होते. या भयंकर स्फोटात भकयम (३५), महादेवी (५०), पंचवर्णम (३५), बालामुरुगन (३०), तमिळचेल्वी (५५), मुनीश्वरी (३२), थंगमलाई (३३), अनिथा (४०) आणि गुरुवम्मल (५५) या नऊ जणांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला : या स्फोटानंतर, रेडडियापट्टी परिसरात असलेल्या मुथू विजयन यांच्या मालकीच्या फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. त्यानंतर लागलेल्या आगीत, वेंबू नावाचा एक कामगार जळून मारला गेला. त्यामुळे मृतांच्या संख्येत आणखी भर पडली. या स्फोटात ५ हून अधिक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्या ठिकाणी स्फोट झाले, त्या दोन्ही ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचावकार्य सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय.
मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला. ते आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, 'आज शिवकाशी जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या फटाका कारखान्यांमध्ये झालेल्या स्फोटात ११ जणांनी आपलं प्राण गमवलं. ही बातमी ऐकून मला खूप दु:ख झालंय. अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना विशेष उपचार देण्याचे निर्देश मी दिले आहेत. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री मदत निधीतून प्रत्येकी ३ लाख रुपये आणि गंभीर जखमींना प्रत्येकी १ लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत', असं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा :