मथुरा (उ. प्रदेश) : श्रीकृष्ण जन्मभूमी ईदगाह प्रकरणासंदर्भात मंगळवारी मथुराच्या दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभागाच्या न्यायालयात पाच स्वतंत्र याचिकांवर सुनावणी होणार होती. परंतु सार्वजनिक सुट्टीमुळे ही सुनावणी होऊ शकली नाही. आता श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणाबाबत पुढील सुनावणी १३ फेब्रुवारी आणि २० फेब्रुवारीला होणार आहे. मंगळवारी फिर्यादी धर्मेंद्र गिरी हे श्रीकृष्णाच्या मूर्तीला (ठाकुरजींना) सोबत घेऊन न्यायालयात पोहोचले होते, मात्र त्यांची साक्ष होऊ शकली नाही.
२३ जानेवारीला झाली होती सुनावणी : फिर्यादी धर्मेंद्र गिरी यांच्या याचिकेवर जिल्ह्यातील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभागाच्या न्यायालयात २३ जानेवारी रोजी सुनावणी झाली होती. त्यावेळी श्रीकृष्ण जन्मभूमी ईदगाह खटल्यातील फिर्यादीला सोबत घ्या, असे न्यायालयात सांगण्यात आले होते. त्यानंतर पुढील सुनावणीची तारीख 7 फेब्रुवारी निश्चित करण्यात आली होती. या आदेशानंतर संत धर्मेंद्र गिरी मंगळवारी श्रीकृष्णाच्या मूर्तीला घेऊन न्यायालयात पोहोचले होते. संतांना श्रीकृष्णाच्या मूर्तीसह न्यायालयात पाहून तेथील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. त्यांनी संतांना सांगितले की ठाकूरजींना त्रास देऊ नका, त्यांचे स्थान घरांत आणि मंदिरांमध्ये आहे. सर्व संत आपल्या आराध्य दैवत श्रीकृष्णाला ठाकुरजी म्हणतात.
पाच महिन्यांपूर्वी याचिका दाखल : वृंदावनचे संत धर्मेंद्र गिरी महाराज म्हणाले की, मुघल शासक औरंगजेबाने मंदिरे पाडून श्रीकृष्ण जन्मभूमी संकुलात मशीद बांधली होती. त्याला हटविण्याची मागणी करणारी याचिका 5 महिन्यांपूर्वी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभागाच्या न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मंदिर परिसरातील बेकायदा बांधकाम हटवून त्या ठिकाणी भगवान कृष्णाचे भव्य मंदिर उभारण्यात यावे, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे.
अन्य चार याचिकांवर सुनावणी झाली नाही : श्रीकृष्ण जन्मभूमी ईदगाह प्रकरणासंदर्भात अनिल त्रिपाठी, दुष्यंत सारस्वत, अखिल भारतीय हिंदू महासभा आणि अन्य एका याचिकेवर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभागाच्या न्यायालयात सुनावणी होणार होती, परंतु कोणतेही काम न झाल्यामुळे ही सुनावणी देखील झाली नाही. या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता पुढील सुनावणी 20 फेब्रुवारी रोजी निश्चित करण्यात आली आहे.