गोवा (पणजी) - गोव्यात शिवसेनेला चांगलेच खिंडार पडले आहे. पक्षाच्या उपाध्यक्ष राखी नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यावेळी नाईक म्हणाल्या राज्यात शिवसेनेला भविष्य नाही, शिवसेनेचे केंद्रीय नेतृत्व पक्षसंघटनेसाठी काम करत नाही. गोव्यात येऊन केवळ सुट्ट्या एन्जॉय करणे एवढेच काम केंद्रीय नेतृत्व करत प्रसिद्धीसाठी पत्रकार परिषद घेत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे. त्या ईटीव्ही भारत'शी बोलत होत्या.
शिवसेनेने गोव्याला वाऱ्यावर सोडले- राखी नाईक
शिवसेनेला आपण वारंवार गोव्यातील प्रशांची जाणीव करून दिली. मात्र, शिवसेनेने त्याकडे नेहमीच डोळेझाक केली. त्यामुळेच शिवसेना पक्ष गोव्याच्या समस्यांविषयी जागरूक नाही. असे असल्यामुळे आगामी काळात गोव्यात शिवसेनेला भविष्यात कोणतीही संधी नसल्याचे दिसून येते. त्या पार्श्वभूमीवर माझ्या शिवसेना उपाध्यक्ष पदाचा राजीनामा मी देत असल्याचे राखी नाईक यांनी सांगितले.
नाईक यांच्या विरुद्ध अनेक तक्रारी- जितेश कामत
राखी नाईक यांनी (२०१९)ची लोकसभा निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावर दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून लढवली होती. मात्र, तेव्हापासून त्या पक्ष संघटनेच्या कार्यात सहभागी झालेल्या नाहीत. त्यांच्याविरुद्ध अनेक तक्रारीही आलेल्या आहेत. दरम्यान, त्यांच्या तक्रारी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दुसऱ्या पक्षातून ऑफर असल्यामुळे पक्षावर टीका करून, त्यांनी आपला राजीनामा दिल्याचे शिवसेना राज्यप्रमुख जितेश कामत यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - केरळमध्ये पावसाचा हाहाकार : विविध घटनांत 11 जणांचा मृत्यू, पाहा थरकाप उडवणारी दृश्य