हमीरपूर (उत्तर प्रदेश) : प्रयागराजमध्ये शनिवारी रात्री पोलिस अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेत होते. या दरम्यान मीडिया कर्मचार्यांच्या वेशात आलेल्या तीन हल्लेखोरांनी गोळीबार करून त्यांची हत्या केली. घटनेनंतर तिघांनीही तत्काळ पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. तीन हल्लेखोरांपैकी एक हमीरपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षांपासून तो त्याच्या घरी गेला नाही. कुटुंबीयांनीही त्याच्यापासून अंतर ठेवले आहे.
सनी कुख्यात गुन्हेगार आहे : अतिक आणि अशरफ यांच्या हत्येतील आरोपी सनी हा हमीरपूरच्या कुरारा भागातील वॉर्ड क्रमांक 6 चा रहिवासी आहे. रविवारी सकाळपासूनच त्याच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याच्या घराभोवती लोकांची खूप गर्दी आहे. प्रभागातील लोकांनी सांगितले की, सनी हा एक कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर कुरारा पोलिस स्टेशनसह अन्य पोलिस ठाण्यात सुमारे 17 गुन्हे दाखल आहेत.
15 वर्षांपासून घरी आलेला नाही : सनीचा मोठा भाऊ पिंटू सिंहने सांगितले की, सनीने खूप पूर्वी घर सोडले होते. त्याची संगतही चांगली नव्हती. त्यामुळे आम्हालाही त्याची पर्वा नाही. सनी जवळपास 15 वर्षांपासून घरी आलेला नाही. ते एकूण तीन भाऊ होते. त्यापैकी एकाचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. सनी सर्वात लहान आहे. त्याचे वडील जगत सिंग यांचेही निधन झाले आहे. आई कृष्णा देवी ह्या मोठा मुलगा पिंटूसोबत राहतात. पिंटूच्या म्हणण्यानुसार, सनीने अजून लग्नही केलेले नाही. उपनिरीक्षक राजेशचंद्र मिश्रा यांनी सांगितले की, सनी अनेक वर्षांपासून घराबाहेर आहे.
5 वर्षे तुरुंगात होता : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरारा येथील रहिवासी बाबू यादव याला सनीने गोळ्या घातल्या होत्या. यात तो थोडक्यात बचावला होता. यानंतर सनीने 2012 साली दरोडा टाकला होता. याप्रकरणी हमीरपूर पोलिसांनी त्याला पकडले होते. या कारवाईत सनीने पोलिसांवरही गोळीबार केला होता. यानंतर त्यांची रवानगी हमीरपूर कारागृहात करण्यात आली होती. येथे तो 5 वर्षे राहिला. या दरम्यान तो तुरुंगात असलेला गुंड सुंदर भाटी याच्या संपर्कात आला. तुरुंगातून सुटल्यानंतर सनीने सुंदर भाटीसह अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग घेतला होता.
हेही वाचा : Atiq Ashraf Murder Case : उमेश पाल हत्याकांडाप्रमाणेच अतिक-अश्रफ हत्याकांड; 'ही' आहेत साम्ये