नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटाखाली 2020 हे वर्ष काढल्यानंतर आज देशवासियांनी नवा संकल्प घेत, नवीन वर्षाचं स्वागत केलं. काँग्रेस नेते राहुल गांधी परदेश दौऱ्यावर आहेत. त्यांनी टि्वट्च्या माध्यमातून देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावरून भाजपा खासदार गिरिराज सिंह यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
'जोपर्यंत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. तोपर्यंत तुम्ही निश्चित होऊन आरामात फिरू शकता आणि आनंद घेऊ शकता. पार्टी हार्ड', असे टि्वट गिरिराज सिंह यांनी केले आहे. त्यांनी राहुल गांधींना मोदी पंतप्रधान आहेत. तोपर्यंत निश्चित होऊन फिरावं आणि भरपूर मजा करावी, असा खोचक टोला लगावला आहे. राहुल गांधी भारतात नसून परदेश दौऱ्यावर गेले आहेत. राहुल गांधी ईटलीला गेल्याची माहिती आहे. राहुल गांधींनी कधीपर्यंत भारतात परत येणार हे सांगितलं नसलं तरी राहुल गांधी आठवडाभरात भारतात परतण्याची शक्यता आहे.
राहुल गांधींकडून नववर्षाच्या शुभेच्छा -
नवीन वर्ष सुरूवातील आपण ज्यांना गमावले त्यांचे स्मरण करूया आणि जे आपले रक्षण आणि त्याग करतात त्यांचे आभार मानूया. प्रतिष्ठा आणि सन्मानाने अन्यायाविरोधात लढणाऱ्या शेतकरी आणि कामगारांसोबत मी आहे, असे टि्वट त्यांनी केले. हे टि्वट रिटि्वट करत गिरिराज सिंह यांनी राहुल गांधींवर टीका केली.
राहुल गांधीच्या इटली दौऱ्यामागचं कारण -
नववर्षाच्या दिवशी राहुल गांधी परदेश दौऱ्यावर जाण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अनेकदा परदेशात नववर्षाचे स्वागत केले आहे. मात्र, यंदा त्यांच्या परदेश दौऱ्यावर विरोधकांकडून जोरदार टिका झाली आहे. देशात शेतकरी आंदोलन सुरू असताना ते परदेश दौऱ्यावर गेल्याने शेतकऱयांनीही नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेस नेते राजीव सातव यांनी राहुल गांधीच्या इटली दौऱ्यामागचं कारण सांगितलं. राहुल गांधी यांच्या आजींची प्रकृती फार खराब आहे. त्यांना भेटण्यासाठी ते गेले आहेत, असे त्यांनी सांगितले होते. राहुल गांधींच्या परदेश दौऱ्याच नुकसान पक्षाला अनेकदा सहन करावं लागलं आहे.