हैदराबाद (तेलंगाणा) वारसा हक्काने मालमत्ता आणि पैसे मिळवण्यासाठी खून झालेले आपण वाचले असेल. इतरही अनेक अवैध गोष्टी पैशासाठी केलेल्या आपण पाहिल्या असतील. अशीच एक भन्नाट घटना तेलंगाणामध्ये उघडकीस आली आहे. येथील हनुमाकोंडा मध्ये पतीपत्नी आणि मुलगा असे तिघेजण राहात होते. मुलगा बेंगळुरू येथे खाजगी कंपनीत नोकरीला होता. लग्नाच्या वेळी तिच्या वडिलांनी हुंडा म्हणून दिलेल्या मालमत्तेची किंमत सध्याच्या बाजारानुसार सुमारे 15 कोटी रुपये आहे. पतीने दुसरे लग्न करून तिच्यापासून सुटका करून घेतली. मात्र तिची मालमत्ता हडप करण्यासाठी तसेच ती मालमत्ता आपल्या नावावर करण्यासाठी तिला त्रास दिला. मुलानेही आपल्यालाही मालमत्तेचा हिस्सा मिळावा असा तगादा लावला. मात्र तिने हे काहीच मान्य केले नाही.
वर्षानुवर्षे मालमत्तेसाठी पती आणि मुलाच्या छळामुळे तिची विवेकबुद्धी हरपली. मात्र तिचा मृत्यू झाला तरच मालमत्ता दोघांच्या नावावर होणार होती. त्यामुळे त्यांनी तिच्या मृत्यूचा कट रचला. 2017 मध्ये एके दिवशी दोघांनी तिला रेल्वेत बसवले. ती कुठेतरी हरवली असे नातेवाईकांना वाटले. त्यानंतर तिचा नवरा दुसऱ्या महिलेसोबत परदेशात गेला. याचा काही काळ नातेवाईकांनाही विसर पडला. महिलेची आई वृद्ध होती आणि ती परिसरात नव्हती, त्यामुळे तिने कधीही आपल्या मुलीबद्दल चौकशी केली नाही.
इकडे ही महिला रेल्वेने चेन्नईला पोहोचली. ती वेड्यासारखी वागत असल्याने तेथील रेल्वे पोलिसांच्या मदतीने अनबागम रिहॅबिलिटेशन सेंटर (Anbagam Rehabilitation Center) या सेवाभावी संस्थेत तिला दाखल केले. मानसिकदृष्ट्या खचून गेल्याने तिला जुन्या गोष्टी तसेच आठवणी विसरली होती. धर्मादाय संस्थेने तिला आश्रय दिला. तिच्यावर उपचार केले आणि तिच्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पण तिला भूतकाळ आठवत नव्हता.
नंतर धर्मादाय संस्थेतील कर्मचारी तिला आधार कार्ड काढण्यासाठी चेन्नईतील केंद्रात घेऊन गेले. फिंगरप्रिंट्स घेताना कळले की तिच्याकडे आधीच कार्ड आहे. त्यावेळी कार्डाचा तपशील पाहिल्यावर ती हनुमाकोंडा जिल्ह्यातील महिला असल्याचे निष्पन्न झाले. या पत्त्यावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कुटुंबीय तिथे नव्हते. त्यानंतर त्यांनी हनुमाकोंडा पोलिसांशी संपर्क साधला. धर्मादाय संस्थेने पाठवलेला फोटो घेऊन ते त्या महिलेच्या मुलाकडे गेले. तिचा फोटो पाहताच मुलगा चपापला. सुरुवातीला नाही म्हणाला. नंतर मात्र ती त्याची आई असल्याचे त्याने कबूल केले. मात्र तिचा मृत्यू झाला असे तो म्हणाला. त्यासंदर्भातील मृत्यूचे प्रमाणपत्र असल्याचे त्याने सांगितले. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांचा कट उघड झाला.
बेपत्ता राहिल्यानंतर पाच वर्षांनी पती आणि मुलाने वारंगल शहर प्रशासनाकडून तिचा मृत्यू झाल्याचे सांगून मृत्यू प्रमाणपत्र घेतले. लगेचच त्यांच्या नावावर असलेली सुमारे १५ कोटी रुपयांची मालमत्ता हस्तांतरित झाली. मालमत्तेसाठी आईचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार केल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. मृत्यू प्रमाणपत्र कसे दिले गेले, याची चौकशी सुरू आहे. ही महिला सध्या धर्मादाय संस्थेच्या आयोजकांकडे आहे. घरच्यांनी परवानगी दिल्यास ते तिला आणू शकतात. यासाठी धर्मादाय संस्थेच्या आयोजकांनी मुख्यमंत्री, राज्यपाल आणि हनुमाकोंडा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे.
हेही वाचा - अटल पेन्शन योजनेत सुधारणा, आयकर भरणारे APY साठी ठरणार अपात्र