शरद पवार आज पंढरपूर दौऱ्यावर
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आज (शुक्रवार, ता. १८) पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. पंढरपूर विधानसभेचे आमदार भारत भालके यांचे अकाली निधन झाल्याने, त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट पवार घेणार आहेत. आमदार भालके यांना शरद पवार यांचे शिष्य मानले जात होते. आमदार भालके हे पवारांना आपल्या वडिलांसमान मानत असत. हे अनेकदा त्यांनी जाहीर सभांमधून, भाषणांमधून व्यक्त देखील केलं. २०१३ साली संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार सरकोली येथे आमदार भारत भालके यांच्या घरी आले होते.
कृषी आंदोलनाचा २३ वा दिवस
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे पारित केले आहेत. हे कायदे रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी पंजाब हरियाणा या राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आजचा या आंदोलनाचा २३ वा दिवस आहे. अनेकदा शेतकरी आणि सरकार यांच्यात या विषयावरून चर्चा झाली आहे. पण यातून अद्याप तोडगा निघालेला नाही. दिवसागणिक हे आंदोलन चिघळत चालले आहे. सर्वोच्च न्यायालयात या विषयावरून एक याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने हे तीन कायदे स्थगित ठेवता येतील का?, याचीही शक्यता पडताळून पहावी, असे केंद्र सरकारला सूचवलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या आंदोलनात शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केल्या आहेत.
दिल्ली विधानसभा विशेष अधिवेशनचा दुसरा दिवस
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारकडून, भाजपाची सत्ता असलेल्या नगर पालिकांमध्ये 2400 कोटी रुपयांचा कथित गैरव्यवहार प्रकरणी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. आज या अधिवेशनाचा दुसरा दिवस असून आजच्या दिवशी, अधिवेशनात एमसीडी (MCD)च्या भाडे दराच्या माफीबाबत चर्चा होणार आहे. काल गुरूवारी या अधिवशनाच्या सुरूवातीला कृषी कायद्यांवर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कृषी कायद्यांवरून केंद्र सरकारवर टीका करत कृषी कायद्याची प्रत विधानसभेत फाडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी परिषदमध्ये होणार सहभागी
मध्य प्रदेशच्या रायसेन येथे आज कृषी परिषद होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे सहभागी होतील. आज सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. मोदी या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी संवाद साधणार आहेत. यात ते नविन तीन कृषी कायदे शेतकऱ्यासाठी कसे फायद्याचे आहेत. यावर भाष्य करणार आहेत.
मध्य प्रदेशमध्ये शाळा आजपासून सुरू
कोरोना प्रादुर्भावामुळे मागील अनेक महिन्यांपासून शाळा बंद आहेत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे आणि सरकारकडून अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अनलॉक प्रक्रियेमध्ये १० वी आणि १२ वीचे वर्ग आजपासून पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. पण १ ली ते ८ वीच्या इयत्तेबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.
राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारला दोन वर्ष पूर्ण
राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारने दोन वर्ष पूर्ण केले आहेत. पण कोरोना महामारी पाहता, हा सोहळा साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या संबधीचे निर्देश दिले आहे. आज गहलोत विविध विकास कामांचा व्हर्चुअल पद्धतीने शुभारंभ करणार आहेत.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आज रस्ते बांधकाम आणि इमारत विभाग या दोन विभागाचा आढावा घेणार आहेत.
बुलेट ट्रेनसाठी जागा हस्तांतरण प्रस्ताव आज ठाणे महापालिकेत मंजूरीसाठी ठेवण्यात येणार
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी ठाणे महानगरपालिकेच्या मालकीची जागा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे आतापर्यंत चार वेळा हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या विषय पटलावर ठेवण्यात आला. मात्र, पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या भूमिकेमुळे तो मंजूर होऊ शकला नाही. त्यामुळे आजच्या पालिका सभेत तर हा प्रस्ताव मंजूर होणार का? हे पाहावे लागेल.
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया दिवस-रात्र कसोटी सामन्याचा दुसरा दिवस
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. उभय संघातील पहिला सामना (डे-नाईट) अॅडिलेड येथे खेळला जात आहे. आज या सामन्याचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराटच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाला पहिल्या दिवसाखेर ८९ षटकांत ६ बाद २३३ धावांपर्यंत मजल मारता आली. वृद्धिमान साहा (९) आणि आर. अश्विन (१५) नाबाद खेळत आहेत. विराटचा अपवाद वगळता एकाही भारतीय फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. चेतेश्वर पुजारा (४३) आणि अजिंक्य रहाणे (४२) यांना चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.
रिचा चढ्ढाचा आज वाढदिवस
बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा हिचा आज वाढदिवस आहे. तिने 'फुकरे,' 'राम-लीला,' 'गँग्स ऑफ वासेपुर,' 'गँग्स ऑफ वासेपुर २,' 'मसान' यांसारख्या चित्रपटात दमदार अभिनय करत प्रेक्षकांची मने जिंकली आहे. रिचा चड्ढाने 'गँग्स ऑफ वासेपुर'मध्ये एका मध्यमवयीन महिलेची भूमिका साकारली होती. त्याआधी तिने दिबाकर बॅनर्जी यांचा चित्रपट 'ओए लकी लकी ओए'मध्ये अभिनेत्री नीतू चंद्रा यांच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली होती. 'फुकरे', 'गोलियों की रासलीला रामलीला,' 'बेनी ॲण्ड बबलू' आदी चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. ती पंकज त्रिपाठीसोबत 'शकिला' या चित्रपटात काम करत आहे. हा चित्रपट २५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.