नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान भाषण केले. मात्र, त्यांच्या भाषणानंतर वाद निर्माण झाला. तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल यांच्यावर महिला खासदारांना फ्लाइंग किस दिल्याचा आरोप केला. याबाबत भाजपाच्या महिला खासदारांच्या वतीने लोकसभा अध्यक्षांकडे तक्रारही करण्यात आली आहे. या वादात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी उडी घेतली आहे. दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपावर टीका केली आहे.
ममत्व संपलेल्यांना प्रेम काय कळणार : राहुल गांधींबाबत पत्रकारांनी खासदार संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, "भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे, जो कोणत्याही गोष्टीचे राजकारण आणि खुलेआम प्रदर्शन करू शकतो. देशासाठी पदक जिंकून आणणाऱ्या महिला कुस्ती खेळाडू जेव्हा भाजपाच्या खासदाराविरोधात जंतरमंतर मैदानावर आंदोलन करत होत्या. तेव्हा या भाजपाच्या नेत्यांमधील कोण गेले होते का तिकडे? राहुल गांधी भाजपाच्या द्वेषाच्या, तिरस्कार, बदला या हिंसक राजकारणाला प्रेमाने उत्तर देत आहेत. त्यांनी संपूर्ण भारतीय जनतेला हा प्रेमाचा फ्लाइंग किस दिला आहे. आपण जेव्हा भेटतो तेव्हा जादू की झप्पी देतो, तसा राहुल गांधींनी जादुई फ्लाइंग किस दिला आहे. भाजपाच्या द्वेषाच्या राजकारणात त्यांनी मोहब्बत की दुकान सुरू केले आहे. ज्या लोकांमध्ये माणुसकी उरली नाही. ममत्व शिल्लक राहिलेले नाही, अशा लोकांना प्रेमाची भाषा कळणार नाही." अशा शब्दात राऊत यांनी भाजपाला टोला लगावला.
मागच्या 10 वर्षात काय झाले ते सांगा : पुढे बोलताना राऊत म्हणाले की, आम्ही यावेळी मोदी सरकारवर अविश्वास प्रस्ताव का आणला हे संपूर्ण देशातील जनतेला माहिती आहे. अमित शाह भाषण करण्यात पटाईत आहेत, त्यांनी ते केले. मात्र मणिपूर जळत आहे, पण आपले पंतप्रधान त्यावर बोलायला तयार नाहीत. त्यांनी देशातील जनतेसमोर आपली मन की बात सांगितली पाहिजे. यावर सरकार म्हणून तुम्ही काय करत आहात, यावर बोलायला ते तयार नाहीत. त्यामुळे त्यांना चर्चेला आणण्यासाठी आमच्याकडे दुसरा पर्याय नसल्याने हा अविश्वास प्रस्ताव आणावा लागला. आम्हाला माहिती आहे आमचे संख्याबळ कमी आहे. तरीही हा प्रस्ताव आणला. आता ते यावर चिडचिड करत आहेत. कारण ते जे करत आहेत, त्याला सभागृहात उत्तरे देता येत नाही. म्हणून ते चिडचिड करत आहेत. भाजपाने मणिपूरला मागच्या 10 वर्षात काय काम केले ते सांगत नाहीत. चाळीस वर्षांपूर्वी काय झाले ते सांगत आहेत. आम्हाला मागच्या 40 नाही तर 10 वर्षात काय केले ते सांगा, असे म्हणत संजय राऊतांनी भाजपावर टीका केली.
हेही वाचा-