कोझिकोड (केरळ) : अलाप्पुझा - कन्नूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये पेट्रोल टाकून आग लावण्याच्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे रुळावर एक महिला, एक बालक आणि एका मध्यमवयीन पुरुषाचे मृतदेह आढळून आले आहेत. ट्रेनला आग लागल्याचे समजताच त्यांनी रेल्वेतून उडी मारली. रहमत (43) आणि तिच्या लहान बहिणीची मुलगी सहारा (2) अशी मृतांची नावे आहेत. तिसऱ्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. तिन्ही मृतदेह एलाथूर स्टेशन ते कोरापुझा पुलाच्या दरम्यान सापडले. मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहेत.
कोणीही गंभीर जखमी नाही : रविवारी रात्री 9.07 वाजता कन्नूरच्या दिशेने निघालेल्या अलप्पुझा - कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेस ट्रेनमध्ये लाल शर्ट आणि टोपी घातलेल्या एका मध्यमवयीन व्यक्तीने डी 1 डब्यात घुसून डब्याला आग लावली. त्यामुळे प्रवाशांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. एका प्रवाशाने सेफ्टी चेन ओढल्यानंतर ट्रेन कोरापुझा ब्रिजवर थांबली. त्यावेळी आगीच्या भीतीने लोक ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करत होते. या घटनेत नऊ जण भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अनिल कुमार (50), त्यांची पत्नी साजिशा (47), मुलगा अद्वैद (21), अश्वथी (29), रुबी (52), रसिक (27), जोतिंद्रनाथ (50), प्रिन्स (39) आणि प्रकाशन (52) अशी भाजलेल्यांची नावे आहेत. या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नाही.
संशयीताने घटनास्थळावरून पळ काढला : घटनेनंतर आग लावल्याचा संशय असलेल्या 35 वर्षीय व्यक्तीने ट्रेनमधून पळ काढल्याचे वृत्त आहे. कोरापुझा पुलावर ट्रेन थांबल्यावर तो पळून गेल्याचे संकेत मिळाले आहेत. हल्लेखोराने लाल शर्ट, काळी पँट आणि टोपी घातलेली आहे. हल्ल्याला बराच वेळ उलटूनही तो अद्याप पकडला गेला नाही. रेल्वे पोलिस आणि केरळ पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी एलाथूर ते कट्टीला पीडीका मार्गे कोरापुझा असा शोध घेतला. आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, जिथे हा हल्ला झाला ती ट्रेन आज दुपारी 2.45 वाजता कन्नूर एर्नाकुलम इंटरसिटी एक्स्प्रेस म्हणून धावेल.