नवी दिल्ली - दिल्लीच्या राऊज एवेन्यू कोर्टाने सीबीआयची कागदपत्रे लीक करण्यासाठी लाच दिल्याप्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा आणि सीबीआयचे एसआय अभिषेक तिवारी यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. विशेष न्यायमूर्ती विमल यादव यांनी हा आदेश दिला. दोघांच्या जामीन अर्जावर 20 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
दोघांची सीबीआय कोठडी शनिवारी संपल्यानंतर दोघांना कोर्टात सादर करण्यात आले. चार सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत सीबीआय कोठडी शनिवार पर्यंत वाढवण्यात आली होती. चार सप्टेंबर पर्यंत दोघांना सीबीआय कोठडीत पाठवले होते. त्याच दिवशी आनंद डागा आणि अभिषेक तिवारी यांनी जामीन याचिका दाखल केली होती.
हे ही वाचा - करुणा मुंडे - शार्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
सुनावणीवेळी सीबीआयने म्हटले होते, की अभिषेक तिवारीने आनंद डागाकडून तपासाची माहिती देण्यासाठी आयफोन 12 प्रो आणि अन्य महागड्या भेटवस्तू स्वीकारल्या. तपासासाठी अभिषेक तिवारी पुणे शहरात गेले होते. तेथे त्यांना लाचेच्या रुपात महागड्या भेटवस्तू दिल्या. माहिती देण्यासाठी तिवारींनी डागाकडून अनेक वेळा भेटवस्तू घेतल्या आहेत.
हे ही वाचा - पुण्यात अपहरण करून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; 8 आरोपी अटकेत तर 5 जणांचा शोध सुरू
सीबीआयकडून दाखल एफआयआरनुसार देशमुख यांच्या विरुद्ध तपास करण्यासाठी तपास अधिकारी आणि सीबीआयचे डीएसपी आरएस गुंजियाल व तिवारी 6 एप्रिल रोजी मुंबईला गेले होते. त्यावेळी दोघांनी 14 एप्रिल रोजी देशमुखसह अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले.
अभिषेक तिवारी यांच्याकडे या प्रकरणाची कागदपत्रे होती. तिवारी यांनी डागा यांना अनेक संवेदनशील कागदपत्रे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शेअर केले होते. त्यानंतर सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने अनिल देशमुख यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता.