भोपाळ - मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात पिकअपच्या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील पोहरी पोलीस ठाणे क्षेत्रातील ककरा गावाच्या जवळ हा अपघात झाला. अपघातात अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शोकसभेवरून माघारी येताना पिकअपचा अपघात झाला.
शोकसभेवरून माघारी येताना अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, विजयपूर तहसीलमधील ढोंढरीखुर्द आणि ढोढरीकला गावातील गुर्जर समाजातील काही लोक जवळील मोरावन गावात शोकसभेसाठी पिकअपमधून गेले होते. मोरोवन येथून कार्यक्रमावरून माघारी येताना पोहरी- श्योपूर रोडवरील ककरा गावाजवळ साडेसहाच्या दरम्यान पिकअप अनियंत्रित होऊन पलटी झाला. वेग जास्त असल्याने वाहन पलटी झाल्याचे बोलले जात आहे.
८ जणांचा जागीच मृत्यू
पिकअपमध्ये सुमारे ४० जण बसलेले होते. अपघातनंतर यातील ८ जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच शिवपूरी जिल्ह्याचे जिल्ह्याधिकारी अक्षय कुमार यांनी रुग्णालयात धाव घेवून जखमींची विचारपूस केली. सर्व जखमींवर योग्य उपचार करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पोलीस पुढील तपास करत आहेत.