दिल्ली - यंदाच्या वर्षी प्रजासत्ताक दिवसाला उत्तर प्रदेशच्या भव्य चित्ररथाला प्रथम स्थान देऊन गौरव करण्यात आला. उत्तर प्रदेशच्या चित्ररथामध्ये राम मंदिर आणि तेथील सांस्कृतिक वारसा पाहायला मिळाला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह गुरुवारी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करतील. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी उत्तर प्रदेशच्या भव्य चित्ररथाला प्रथम स्थान मिळाले आहे. उत्तर प्रदेशचे माहिती संचालक शिशिर यांच्याकडून उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाल्याची माहिती देण्यात आलीय. संपूर्ण संघाचे मनापासून अभिनंदन. गीतकार वीरेंद्र सिंग यांचे विशेष आभार, असे टि्वट संचालक शिशिर केले आहे.
चित्ररथामध्ये राम मंदिराच्या प्रस्तावित मॉडेलसह, रामनगरीमध्ये होणार्या दीपोत्सवाची झलकही पाहायला मिळाली. यासह, रामायण रचताना महर्षी वाल्मीकी यांनाही चित्रित केले होते. यासह रामनागरी अयोध्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची झलक या चित्ररथात दिसून आली. चित्ररथाच्या समोरच्या भागात महर्षी वाल्मीकीची एक मूर्ती बसवलेली होती.
यंदा 28 राज्यांमधील चित्ररथाला परेडमध्ये स्थान देण्यात आले होते. महाराष्ट्र, गुजरात, सिक्कीम, कर्नाटक, केरळ, त्रिपुरा, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, आसाम, तमिळनाडू या राज्यांच्या चित्ररथांचा समावेश होता. यावेळी केदारनाथ मंदिर, कोरोना लसीवर आधारित चित्ररथ पाहायला मिळाले.