नवी दिल्ली : कोरोना उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमधून रेमडेसिवीरला काढून टाकण्यात येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दिल्लीतील गंगाराम रुग्णालयाचे पदाधिकारी डॉ. डी. एस. राणा यांनी सांगितले, की कोरोना रुग्णांवरती रेमडेसिवीर इंजेक्शन प्रभावी आहे, असे कोणत्याही अभ्यासात समोर आले नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.
यापूर्वी हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आणि प्लाझ्मा थेरपीही करण्यात आलीये बंद..
यापूर्वी हायड्रॉक्सिक्लोरोक्विन नावाचे औषधही असेच कोरोना उपचारासाठी वापरले जात होते. मात्र काही काळानंतर त्याचे दुष्परिणाम समोर आल्याने त्यावर बंदी घालण्यात आली. तसेच, पहिल्या लाटेत परिणामकारक वाटलेली प्लाझ्मा थेरपीही बंद करण्यात आली आहे.
प्लाझ्मा थेरपीमध्ये आपण कोरोनामधून बरे झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा दुसऱ्या एका रुग्णाला देतो. जेणेकरुन त्या प्लाझ्मामधील अँटीबॉडी दुसऱ्या रुग्णालाही उपयोगी ठराव्यात. मात्र, प्लाझ्मा दिल्याने रुग्णाच्या स्थितीमध्ये कोणताही बदल होत नसल्याचे आता एका अभ्यासात समोर आले आहे. तसेच, प्लाझ्मा हा सहजासहजी उपलब्धही होत नाही. ही थेरपी वैज्ञानिक दृष्ट्याच सुरू करण्यात आली होती, आणि आता पुराव्यांच्या आधारेच ही बंद करण्यात आली आहे; अशी माहिती डॉ. राणा यांनी दिली.
लवकरच प्रभावी औषध मिळेल..
कोरोना रुग्णांच्या उपचारांमध्ये आम्ही तेच औषध पुढे वापरणे सुरू ठेवतो, ज्याचा काही अंशी तरी परिणाम दिसून येतो. रेमडेसिवीरचा कोरोना विषाणूवर कोणताही परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे त्याचा वापर थांबवायला हवा. सध्या केवळ तीन औषधेच कोरोनावर गुणकारी ठरत आहेत. संशोधक या विषाणूवर अजूनही अभ्यास करत आहेत. कोरोनावर कोणते औषध प्रभावीपणे काम करेल याचा शोध अजूनही सुरू आहे. लवकरच संशोधकांना यामध्ये यशही येईल, असे राणा पुढे म्हणाले.
आयसीएमआरने सोमवारी जारी केलेल्या नव्या गाई़डलाईन्सनुसार कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
हेही वाचा : 'तौक्ते'चा तडाखा! गुजरातमध्ये १३ ठार; पंतप्रधान मोदी आज करणार पाहणी