नवी दिल्ली - दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांचा तिहार तुरुंगातील मसाजचा व्हिडीओ समोर आल्यानंतर (Satyendar Jain massage video) त्यांची जेलमधील सुविधा कमी करण्यात आली आहे. तर मसाज करणाऱ्या कैद्यालाही दुसऱ्या वॉर्डात हलवण्यात आले आहे. तिहार तुरुंगातून मिळालेल्या माहितीनुसार, सत्येंद्र जैन यांना त्यांच्या सेलमध्ये फिजिओथेरपी दिली जाणार नसून त्यांना फिजिओथेरपीसाठी तिहार तुरुंगात उभारलेल्या फिजिओथेरपी सेंटरमध्ये जावे लागेल. (Satyendar Jain in tihar jail).
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे २४ तास देखरेख - सत्येंद्र जैन यांच्या कंबरेमध्ये समस्या असून त्यांना कंबरेला बांधण्यासाठी बेल्ट देण्यात आला आहे. तिहार तुरुंगातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सत्येंद्र जैन यांना तुरुंग क्रमांक ७ मधील सेलमध्ये ज्या अतिरिक्त उश्या, गालिचा आणि खुर्च्या दिल्या होत्या त्या देखील त्यांच्याकडून काढून घेण्यात आल्या आहेत. मात्र बहुतांश कैद्यांच्या सेलमध्ये टीव्ही लावण्यात आल्याने सत्येंद्र जैन यांच्या सेलमध्येही टीव्ही ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तिहार तुरुंगातील ज्या सेलमध्ये सत्येंद्र जैन यांना ठेवण्यात आले आहे तेथे अर्धा डझनहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे २४ तास नजर ठेवली जात आहे.
तुरुंगात योग्य आहार मिळत नसल्याचा आरोप - दुसरीकडे, न्यायालयाने तिहार तुरुंगाचे डीजी आणि तुरुंग अधीक्षकांना सत्येंद्र जैन यांना कोणत्या प्रकारचे अन्न दिले जात आहे किंवा आधी कोणत्या प्रकारचे अन्न दिले जात होते, या संदर्भात विचारले आहे. या सोबतच विशेष न्यायाधीश विकास धुळ यांनी 21 ऑक्टोबरला जैन यांचा एमआरआय स्कॅन करायचा होता, तो का होऊ शकला नाही का, याचा जाबही तुरुंग प्रशासनाला विचारला आहे. जैन यांच्या अर्जासंदर्भात कारागृह अधिकाऱ्यांकडून या प्रश्नांची उत्तरे मागविण्यात आली होती. एका वकिलामार्फत दाखल केलेल्या अर्जात मंत्र्याने तुरुंग प्रशासनावर आरोप केला आहे की, त्यांना गेल्या १२ दिवसांपासून उपवासाचे जेवण दिले जात नाही. तसेच त्यांना तुरुंगात उपाशी ठेवले जात आहे. तथापि, बुधवारी तिहार तुरुंगातील सूत्रांकडून दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांचे एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, त्या फुटेजमध्ये ते योग्य आहार घेताना दिसत आहेत. तिहार तुरुंगातील सूत्रानुसार, तुरुंगात असताना त्याचे वजन 8 किलोने वाढले आहे, तर त्याच्या वकिलाने दावा केला आहे की त्याचे वजन 28 किलोने कमी झाले आहे.