बंगळुरू : 'ब्रह्मोस'तर्फे तयार करण्यात येणाऱ्या 'आकाश' या अँटी एअरक्राफ्ट मिसाईलच्या निर्यातीसाठी केंद्राकडून निर्देश मिळाले आहेत. त्यामुळे आम्ही आता आमची उत्पादन क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे, कंपनीचे प्रमुख सुधीर कुमार मिश्रा यांनी आज स्पष्ट केले. ईटीव्ही भारतशी केलेल्या विशेष चर्चेत त्यांनी याबाबत माहिती दिली.
'आकाश' येणार लहान रुपात..
मिश्रा म्हणाले, की ब्रह्मोस गेल्या कित्येक दिवसांपासून या क्षेपणास्त्राचे लहान व्हर्जन बनवण्याचा प्रयत्न करत आहे. 'सुखोई ३० एमकेआय', एलसीए तेजस आणि सध्या अंडर-डेव्हलपमेंट असलेल्या एएमसीए या लढाऊ विमानांमध्ये या लहान क्षेपणास्त्राचा वापर करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पाच बिलियन डॉलर्सची निर्यात..
पुढील पाच वर्षांमध्ये संरक्षण विभागाची निर्यात ही पाच बिलियन डॉलर्सची करण्याचे लक्ष्य मोदी सरकारने ठेवले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने आकाश मिसाईलच्या निर्यातीसाठी परवानगी दिली होती. तसेच, संरक्षण विभागातील निर्यातीला जलदगतीने परवानगी देण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एका पॅनलचीही स्थापना करण्यात आली होती.
आकाश मिसाईलमध्ये ९६ टक्क्यांहून अधिक स्वदेशी पार्ट्सचा वापर करण्यात आला आहे. २५ किलोमीटर दूर असलेल्या लक्ष्याला भेदण्याची क्षमता या मिसाईलमध्ये आहे.
हेही वाचा : पाकिस्तानच्या गोळीबारात जवान हुतात्मा; सुंदेरबानी सीमेवरील घटना