नवी दिल्ली - कोरोनाविरुध्द लढत असतानाच म्यूकरमायकोसिसचे संकट उभे ठाकल्याने आरोग्य विभागही धास्तावला आहे. नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात म्यूकरमायकोसिसचा एक दुर्मिळ प्रकार उघडकीस आला आहे. व्हाइट फंगसमुळे शरीरातील लहान आतड्यात आणि मोठ्या आतड्यात छिद्र पडल्याचे समोर आले आहे. जगातील ही पहिलीच घटना असावी, असे रुग्णालय प्रशासनाने म्हटलं आहे. व्हाइट फंगसने रुग्णाच्या लहान आतड्यावर आणि मोठ्या आतड्यावर परिणाम केला आहे.
रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, 13 मे रोजी 49 वर्षीय महिलेला आपत्कालीन स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संबंधित महिलेच्या पोटात, बद्धकोष्ठतेत असह्य वेदना तर तीला उलट्याचा त्रास होता. संबंधित महिलेला कर्करोग होता. काहीदिवसांपूर्वीच कर्करोगामुळे महिलेचा एक स्तन काढून टाकण्यात आला होता. तर 4 आठवड्यांपूर्वी तिची केमोथेरपी झाली होती. रुग्णाची मेडिकल हिस्ट्री पाहता सीटी स्कॅनद्वारे डॉक्टरांनी महिलेची तपासणी केली. यावेळी लहान आतड्यात छिद्र असल्याचे निदर्शनास आले.
ऑपरेशनद्वारे बंद केले छिद्र -
महिलेच्या पोटात पाईप टाकून शस्त्रक्रिया करणे खूप आव्हानात्मक होते. यासाठी 4 तास लागले आणि अन्ननलिका, लहान आतडे आणि मोठ्या आतड्यांत पडलेले छिद्र ऑपरेशनद्वारे बंद केले. यासह, आतड्याचा एक तुकडा देखील बायोस्कीसाठी पाठविला गेला आहे, जेणेकरुन व्हाइट फंगस आताड्यापर्यंत कसा पोहचला, हे कळेल, असे डॉक्टर समीरन नंदी यांनी सांगितले.
कदाचित जगातली ही पहिली घटना -
अन्ननलिका, लहान आतडे आणि मोठ्या आतड्यात व्हाइट फंगसमुळे छिद्र पडणे हे पहिलेच प्रकरण आम्ही पाहिले. अद्याप कोणत्याही वैद्यकीय साहित्यात असे प्रकरण प्रकाशीत झालेले नाही. रुग्णाच्या शरीरात रोगाशी लढण्याची क्षमता खूप कमी होती, असे डॉ. अनिल अरोरा म्हणाले.
तीन आजारांनी महिला पीडित -
पीडित व्यक्ती कर्करोगाने ग्रस्त होती. यातच महिलेला कोरोनाची लागण झाली. कोरोनानंतर महिलेला व्हाईट फंगस झाला. मात्र, महिला पहिल्यापासून आजारी असल्यामुळे तीला व्हाइट फंगसचा जास्त त्रास झाला. महिला सध्या रुग्णालयात असून काही दिवसानंतर महिलेला डिस्चार्ज देण्यात येईल.