रामोजी फिल्म सिटी ( हैदराबाद ) : नयनरम्य वातावरण आणि आकर्षक अशा विद्युत रोषणाईमध्ये, रामोजी ग्रुपचे अध्यक्ष रामोजी राव यांची नात बृहतीचा विवाह सोहळा हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
किरण चेरुकुरी आणि शैलजा यांची मुलगी बृहती हिचा विवाह दंडमुडी अमर मोहनदास आणि अनिता यांचा मुलगा व्यंकट अक्षयसोबत झाला. सोहळ्यासाठी रविवारी रात्री 12.18 वाजताचा मुहूर्त होता. कुटुंब आणि मित्रांव्यतिरिक्त, राजकारण आणि मनोरंजन उद्योगातील अनेक महत्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीत विवाहसोहळा साजरा झाला.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि त्यांच्या पत्नी उषा, सरन्यायाधीश एन व्ही रमणा, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी, तेलंगणाचे मंत्री हरीश राव, मोहमूद अली, इंद्रकरण रेड्डी आणि अनेक प्रमुख उपस्थितांनी नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिला.
प्रसिद्ध टॉलीवूड दिग्दर्शक एसएस राजामौली, टॉलिवूड मेगास्टार चिरंजीवी, सुपरस्टार रजनीकांत आणि बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधू आदी प्रमुख मान्यवर या विवाहसोहळ्यासाठी उपस्थित होते. यावेळी टीडीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारा चंद्राबाबू नायडू, त्यांचा मुलगा लोकेश, जनसेना अध्यक्ष आणि चित्रपट अभिनेता पवन कल्याण यांचीही वधुवरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थिती होती.