बंगळुरू - सीडी स्कँडल प्रकरणात भाजपच्या नेत्यांकडून सहकार्य मिळत नसल्याने माजी मंत्री रमेश जारकीहोळी हे निराश झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भेट घेतली आहे.
सीडी स्कँडल प्रकरणातून बाहेर पडण्याच्या मार्गावर माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असावी, असे सूत्राने म्हटले आहे. सीडी स्कँडलमधून बाहेर पडण्यासाठी काय पावले उचलावीत यावर जारकीहोळी यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचे सूत्राने सांगितले. देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्याशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे माजी मंत्री जारकीहोळी हे माजी मुख्यमंत्री फडवणीसांच्या माध्यमातून संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सूत्राने सांगितले.
हेही वाचा-Gold किमतीत चढ-उतार सुरू; जाणून घ्या, गुंतवणुकीची योग्य वेळ
एका युवती सोबतचा अश्लील व्हिडिओ झाला होता व्हायरल
काही दिवसांपूर्वी रमेश जारकीहोळी यांचा एका युवतीसोबतचा अश्लील व्हिडिओ समोर आला होता. नोकरीच्या आमिषाने त्यांनी युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळी यांनी हा आरोप केला होता. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. हे प्रकरण न्यायालयात आहे. दरम्यान, या वादग्रस्त प्रकरणानंतर त्यांनी पहिल्यांदाच कोल्हापूरात येऊन अंबाबाईचे दर्शन घेतले होते.
हेही वाचा-सोन्यासह चांदीच्या दरात पुन्हा दरवाढ; जाणून घ्या आजचे दर
काय आहे प्रकरण?
दोन मार्च रोजी एक व्हिडिओ माध्यमांमध्ये समोर आला होता. या व्हिडिओमध्ये रमेश जारकीहोली हे एका महिलेसह आक्षेपार्ह परिस्थितीत दिसून येत आहेत. या महिलेला नोकरी देण्याच्या निमित्ताने रमेश यांनी या महिलेचे शोषण केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लाहल्ली यांनी केला होता. यानंतर तीन मार्चला जारकीहोळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तर कल्लाहल्ली यांनी सहा मार्चला आपली तक्रार मागे घेतली होती.दरम्यान, याप्रकरणी एसआयटीने काही जणांना अटकही केली होती. तर येदीयुरप्पा सरकारमधील सहा मंत्र्यांनी माध्यमांविरोधात बंगळुरू उच्च न्यायालयात धाव घेतली होती. माध्यमांनी आपली बदनामी होईल असे काही प्रदर्शित करू नये अशी या मंत्र्यांची मागणी होती.
हेही वाचा-फेसबुकसह व्हॉट्सअपची चौकशी प्रकरण: दिल्ली उच्च न्यायालयाकडून निकाल राखीव
सीडी समोर आल्यानंतर २४ तासांच्या आत दिला होता राजीनामा-
अश्लील सीडी समोर आल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत कर्नाटकचे जलसंपदामंत्री तसेच बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. अश्लील सीडी समोर आल्यानंतर विरोधकांकडून अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली होती. त्यानंतर जारकीहोळी यांनी वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आपला राजीनामा मुख्यमंत्री एडीयुरप्पा यांच्याकडे सुपूर्द केला होता.